

मुंबई: अठरा महिन्यांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरुन फेकून दिल्याप्रकरणी दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीविरुद्ध अखेर दिडोंशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
इमारतीमधील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेगाव येथील शिवशक्ती प्रकल्प क्रमांक एक इमारतीच्या सहाव्या मजल्यावर हे कुटुंबिय राहतात.
बुधवारी १४ ऑक्टोंबरला रात्री मुलगी घरासमोरच खेळत होती. खेळताना ती अचानक गायब झाली. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेच दिसली नाही. तिच्या भावाने रेलिंगवरुन खाली पाहिले, यावेळी त्याला मुलगी ही तळमजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची दिसून आली.
त्यामुळे तिचा भाऊ खाली गेला आणि त्याने तिला मालाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. या घटनेची माहिती नंतर दिडोंशी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन इमारतीमधील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये तिथेच राहणार्या एका दहा वर्षांच्या मुलीने अठरा महिन्यांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरुन फेंकून दिल्याचे दिसून आले.
आरोपी मुलगी त्या लहान मुलीला काही इशारा करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती लहान मुलगी तिच्याजवळ गेली. ती खाली पडल्यानंतर दहा वर्षांची मुलगी घराच्या दिशेने पळून गेली. काही वेळाने ती पुन्हा बाहेर आली. सहाव्या मजल्यावर सायकल चालवत असल्याचे दिसत होते. या फुटेजनंतर हा अपघात नसून घातपात असल्याचा कुटुंबियांचा आरोप होता.
कठड्याची उंची आणि ती लहान मुलगी त्या कठड्यावरुन चढून खाली पडणे अशक्य होते. त्यामुळे या मुलीविरुद्ध कारवाई करुन तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली होती.
त्यांच्या जबानीसह सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर पाच दिवसानंतर दिडोंशी पोलिसांनी संशयित दहा वर्षांच्या मुलीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगिलते.