

भारतीय महिला संघाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वीच इंग्लंडच्या महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाची नियमित कर्णधार नेट सायव्हर-ब्रंट दुखापतीमुळे या महत्त्वाच्या सामन्याला मुकणार आहे. तिच्या अनुपस्थितीत संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दुसऱ्या खेळाडूकडे सोपवण्यात आली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधील तिसरा सामना 4 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी इंग्लंडला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. या सामन्यात पराभव झाल्यास इंग्लंड मालिका गमावेल. अशा निर्णायक सामन्यापूर्वीच कर्णधार नेट सायव्हर-ब्रंट दुखापतग्रस्त झाल्याने इंग्लंडच्या चिंता वाढल्या आहेत. तिच्या जागी अनुभवी टॅमी बोमाँट संघाचे नेतृत्व करेल.
इंग्लंड क्रिकेट मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, नेट सायव्हर-ब्रंटला पाठीच्या दुखापतीमुळे तिसऱ्या टी-20 सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. अद्याप तिचे स्कॅनिंग होणे बाकी असून, त्यानंतरच ती मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकेल की नाही, हे स्पष्ट होईल. खबरदारीचा उपाय म्हणून, फलंदाज माइया बाउचियर हिला तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
भारताविरुद्धच्या चालू मालिकेत नेट सायव्हर-ब्रंटने पहिल्या टी-20 सामन्यात 66 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती; मात्र इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. दुसऱ्या सामन्यातही तिने 13 धावांचे योगदान दिले. तिच्या अनुपस्थितीचा इंग्लंडच्या फलंदाजीवर निश्चितच परिणाम होईल, कारण तिच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव असून, तिने स्वबळावर इंग्लंडला अनेक सामने जिंकून दिले आहेत. सायव्हर-ब्रंटने इंग्लंडसाठी आतापर्यंत 137 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2960 धावा केल्या आहेत, ज्यात 18 अर्धशतकांचा समावेश आहे.
या टी-20 मालिकेत आतापर्यंत भारतीय महिला संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात स्मृती मानधनाच्या नाबाद 112 धावांच्या शतकी खेळीमुळे आणि हरलीन देओलच्या 43 धावांच्या योगदानामुळे भारताने 210 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर एस. चरणीच्या चार बळींच्या जोरावर भारताने तो सामना 97 धावांनी जिंकला. दुसऱ्या टी-20 सामन्यातही भारताने 24 धावांनी विजय नोंदवत मालिकेत विजयी आघाडी कायम ठेवली आहे.