
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशीच्या चहपानापर्यंत पहिल्या डावात 7 बाद 564 धावा केल्या. यादरम्यान, गिल आणि जडेजा यांच्यातील 203 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारतीय संघ पुन्हा एकदा मजबूत स्थितीत पोहोचला. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपहारापूर्वी रवींद्र जडेजा 89 धावांवर तंबूत परतला. तो उत्कृष्ट लयीत दिसत होता, परंतु इंग्लंडने आखलेल्या शॉर्ट-पिच गोलंदाजीच्या रणनीतीमुळे त्याला चुकीचा फटका खेळण्यास भाग पाडले. यासह, या जोडीने 'सेना' देशांमध्ये भारतासाठी सहाव्या गड्यासाठी चौथी सर्वात मोठी भागीदारी नोंदवली.
'सेना' देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) भारतासाठी सहाव्या गड्यासाठी सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. त्यांनी 1997 मध्ये केपटाऊन येथे 222 धावांची भागीदारी केली होती. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांचे नाव आहे; या दोघांमध्ये 2022 मध्ये बर्मिंगहॅम येथे 222 धावांचीच भागीदारी झाली होती. लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांच्यात 2018 मध्ये सहाव्या गड्यासाठी 204 धावांची भागीदारी झाली होती. गिल आणि जडेजा यांनी गुरुवारी सहाव्या गड्यासाठी 279 चेंडूंत 203 धावा जोडल्या.
भारताने दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात पाच बाद 310 धावांवरून केली आणि सकाळच्या सत्रात 25 षटकांत जडेजाच्या रूपात एक गडी गमावून 109 धावा जोडल्या. गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दुसऱ्या सत्रात आपले स्थान अधिक मजबूत करण्याच्या आणि इंग्लंडला लीड्सप्रमाणे पुनरागमन करू न देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
खेळपट्टीकडून विशेष मदत मिळत नसल्याने इंग्लंडने गिल आणि जडेजाविरुद्ध शॉर्ट-पिच गोलंदाजीची योजना अवलंबली, परंतु सकाळच्या सत्रात ती फारशी प्रभावी ठरली नाही. जोश टंगने सत्राच्या अखेरीस शॉर्ट चेंडूवर सत्रातील एकमेव यश मिळवले. जडेजा उसळत्या चेंडूवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि यष्टीरक्षक जेमी स्मिथने एक सोपा झेल टिपला.