

बर्मिंगहम : भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर येताच शुभमन गिलच्या बॅटमधून धावांची जणू आतषबाजीच सुरू झाली आहे. लीडस्मधील पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर, 25 वर्षीय गिलने एजबॅस्टन येथे सुरू असलेल्या दुसर्या कसोटीत आपले पहिलेवहिले द्विशतक साजरे करत या आतषबाजीची आणखी एकदा प्रचिती आणून दिली. त्याच्या या धडाकेबाज, अविस्मरणीय खेळीमुळे भारताने सर्वबाद 587 धावांचा डोंगर रचला, तर प्रत्युत्तरात इंग्लंडने 51 षटकांच्या खेळात 77 धावांत 3 गडी गमावले होते. शुभमनच्या या 269 धावांच्या अविस्मरणीय खेळीने केवळ भारताला सामन्यात मजबूत स्थितीत आणले नाही, तर अनेक ऐतिहासिक विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
सामन्याच्या दुसर्या दिवशी गिलने आपल्या डावाला पुढे नेताना कमालीचा संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ दाखवला. त्याने 311 चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने तब्बल 21 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार लगावत इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकायला लावले. या खेळीसह गिल इंग्लंडच्या भूमीवर कसोटीत द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. हा एक असा विक्रम आहे, जो आजपर्यंत कोणत्याही आशियाई कर्णधाराला जमला नव्हता.
विक्रमांची ही मालिका इथेच थांबली नाही. गिलने इंग्लंडमधील भारतीय कर्णधाराच्या सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही आपल्या नावे केला. त्याने 1990 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनने मँचेस्टर येथे केलेल्या 179 धावांच्या विक्रमाला मागे टाकले. इतकेच नव्हे, तर इंग्लंडमध्ये कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. याबाबतीत त्याने ‘लिटल मास्टर’ सुनील गावसकर यांनाही मागे टाकले. गावसकर यांनी 1979 मध्ये ओव्हलच्या मैदानावर 221 धावांची खेळी केली होती, गिलने 222 धावा करत हा 45 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, सुनील गावसकर आणि मन्सूर अली खान पतौडी यांच्यानंतर कसोटीत कर्णधार म्हणून द्विशतक झळकावणारा गिल हा केवळ पाचवा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याची ही खेळी केवळ धावांसाठीच नव्हे, तर त्याच्या नियंत्रणासाठीही ओळखली जाईल. गिलच्या या ऐतिहासिक खेळीमुळे भारताने पकड घट्ट केली असून, 510 धावांनी पिछाडीवर असलेल्या इंग्लंडसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
भारतीय कर्णधार म्हणून सर्वोच्च धावसंख्या : यापूर्वीचा विक्रम (254*) मागे टाकला.
इंग्लंडमध्ये भारतीयाची सर्वोच्च धावसंख्या : यापूर्वीचा 221 धावांचा विक्रम मोडला.
कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक : गिलने आपल्या कारकिर्दीतील एक मोठा टप्पा गाठला.