

ind vs sa test series kolkata test match jurel in reddy sudarshan drop
टीम इंडियाचा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल सध्या शानदार फलंदाजी करत आहे. दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्धच्या दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये जुरेलच्या बॅटमधून शतके झळकली आहेत. त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळे, १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यात खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याचे खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. जुरेलकडे दुर्लक्ष करणे आता अत्यंत कठीण आहे. वृत्तानुसार, प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची निवड स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून होण्याची शक्यता आहे.
वृत्तसंस्था पीटीआयच्या हवाल्याने बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, जुरेल स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून खेळण्याची दाट शक्यता आहे. त्याला साई सुदर्शनच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर किंवा अष्टपैलू नीतीश कुमार रेड्डीच्या जागी खालच्या फळीत फलंदाजीसाठी उतरवले जाऊ शकते. भारतीय खेळपट्ट्यांवर संघाला रेड्डीच्या गोलंदाजीची फारशी गरज भासणार नाही.
असे मानले जात आहे की, वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबाद येथील कसोटीच्या पहिल्या डावात रेड्डीला फक्त चार षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळाल्यानंतर, दिल्ली कसोटी सामन्यात देवदत्त पडिक्कलला खेळवण्याबाबत गंभीरपणे विचारविनिमय झाला होता. दिल्ली कसोटीत फलंदाजीसाठी काही वेळ मिळावा म्हणून रेड्डीला फलंदाजीच्या क्रमवारीत वर पाठवले गेले होते, परंतु त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
जुरेलने भारत 'अ' संघाकडून खेळताना द. आफ्रिका 'अ' संघातील दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतकी खेळी साकारली. या सामन्यात तो केवळ फलंदाज म्हणून खेळला होता. दुसरीकडे, पंतने दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्ध केवळ यष्टीरक्षणच केले नाही, तर संघाचे कर्णधारपदही सांभाळले.
घरच्या हंगामाच्या सुरुवातीपासून जुरेलने १४०, १ आणि ५६, १२५, ४४ आणि ६, नाबाद १३२ आणि नाबाद १२७ धावांच्या खेळी केल्या आहेत. या दरम्यान, त्याने मागील आठ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.
जुरेलला कोलकाता कसोटीत संधी मिळाल्यास, फलंदाज साई सुदर्शन किंवा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू नीतीश कुमार रेड्डी यापैकी एकाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
२४ वर्षीय ध्रुव जुरेलने आतापर्यंत भारतासाठी आपल्या कारकिर्दीत ७ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १ शतक आणि एका अर्धशतकासह ४३० धावा केल्या आहेत. जुरेलने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. आता कोलकाता कसोटीत ध्रुव जुरेल कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तत्पूर्वी, टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध आपली शेवटची कसोटी मालिका खेळली होती.