

Royal Challengers Bengaluru IPL 2026 RCB for sale Adani Group interest
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (RCB)ला विकत घेण्यासाठी सहा कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. यामध्ये अदानी समूहाचाही समावेश आहे. सध्या आरसीबीचे स्वामित्व 'डियाजियो ग्रेट ब्रिटन' (Diageo Great Britain) या कंपनीकडे आहे.
क्रिकबझच्या अहवालानुसार, आरसीबीच्या मालकीच्या कंपनीने IPL आणि महिला प्रीमियर लीग (WPL) संघांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली असून, ३१ मार्च २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
याच वर्षी आरसीबीने आपल्या पहिल्या IPL विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. २००८ मध्ये लीगची सुरुवात झाल्यापासून सलग १७ हंगामात त्यांना कधीच विजेतेपद जिंकता आले नव्हते. अखेरीस, १८ वर्षांनंतर RCB ने IPL ट्रॉफीवर नाव कोरले. योगायोगाने, या पहिल्या ऐतिहासिक विजयानंतर लगेचच फ्रँचायझी विकली जाण्याच्या चर्चांना जोर आला होता आणि आता आरसीबीची विक्री केली जाणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आहे.
क्रिकबझच्या आणखी एका वृत्तानुसार, 'डियाजिओ' कंपनी विक्रीच्या शेवटच्या क्षणीदेखील यू-टर्न घेऊ शकते, अशी सर्वसाधारण धारणा आहे. तथापि, कंपनीच्या अनेक भागधारकांमध्ये मुख्य व्यवसाय आणि ऑपरेशन्स वगळता IPL संघ ठेवण्याबद्दल अस्वस्थता आहे. त्यांची इच्छा आहे की IPL आणि WPL दोन्ही संघ विकले जावेत.
अहवालानुसार, आरसीबी खरेदी करण्यात उत्सुक असलेल्या कंपन्यांमध्ये अदानी समूहासह, अदार पूनावाला यांची ‘सीरम इन्स्टिट्यूट’ आणि पार्थ जिंदाल यांची ‘जेएसडब्ल्यू ग्रुप’ यांचा समावेश आहे. जेएसडब्ल्यू ग्रुपची आणखी एका IPL फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्समध्ये ५० टक्के भागीदारी आहे. याव्यतिरिक्त, दिल्लीतील एका मोठ्या उद्योगपतीनेही आरसीबी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, अमेरिकेतील दोन खासगी इक्विटी कंपन्यांनीही यात रस दाखवल्याचे समोर आले आहे.