

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिले-वहिले महिला वन-डे विश्वचषक 2025 विजेतेपद पटकावलेला अंतिम सामना विक्रमी ठरला आहे. या सामन्याने भारतात डिजिटल व्ह्यूअरशिपचे (पाहणाऱ्यांची संख्या) मोठे विक्रम नोंदवले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर 185 दशलक्ष (18.5 कोटी) दर्शकांनी पाहिला. हा आकडा 2024 च्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक अंतिम सामन्याच्या व्ह्यूअरशिपएवढा आहे. तसेच, हा आकडा 2025 च्या ‘आयपीएल’च्या सरासरी दैनंदिन व्ह्यूअरशिपपेक्षा जास्त आहे. टीव्हीवर हा अंतिम सामना 92 दशलक्ष (9.2 कोटी) दर्शकांनी पाहिला. हा आकडा 2024 च्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक आणि 2023 च्या पुरुषांच्या वन-डे विश्वचषक (ज्यात भारत सहभागी होता) यांच्या अंतिम सामन्याच्या व्ह्यूअरशिपएवढा आहे.
अंतिम सामन्याचे ठिकाण असलेल्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर (नवी मुंबई) सुद्धा प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. 39,555 प्रेक्षकांनी मैदानात उपस्थित राहून भारतीय महिला संघाला इतिहास रचताना पाहिले. 5 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान गट सामन्याने महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सर्वाधिक व्ह्यूअरशिपचा मागील विक्रम (28.4 दशलक्ष) नोंदवला होता. हा विजय आणि दर्शकांचा प्रतिसाद महिला क्रिकेटची लोकप्रियता किती झपाट्याने वाढत आहे, हे अधोरेखित करतो.