

IND vs SA ODI series Ruturaj Gaikwad vs Yashasvi Jaiswal
भारतीय संघाला नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत ०-२ अशा पराभव पत्करावा लागला. कसोटी सामने संपल्यानंतर आता दोन्ही देशांदरम्यान वनडे आणि टी-२० मालिका खेळली जाणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेची सुरुवात ३० नोव्हेंबर पासून होत असून, टी-२० मालिका ९ डिसेंबर पासून खेळली जाईल.
कर्णधार शुभमन गिल याला मानेच्या स्नायूमध्ये ताण आल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत खेळणार नाहीये. त्यामुळे, रोहित शर्मासोबत सलामी जोडीदाराच्या भूमिकेत ऋतुराज गायकवाड किंवा यशस्वी जैस्वाल यापैकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वनडे मालिकेत भारतीय संघ काहीसा बदललेला दिसेल. शुभमन गिल 'नेक इंजरी'मुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलच्या खांद्यांवर सोपवण्यात आली आहे. शुभमन बाहेर पडल्यामुळे, वनडे मालिकेत रोहित शर्मासाठी एका नवीन सलामीच्या जोडीदाराचा शोध सुरू झाला आहे.
भारतीय संघाकडे या भूमिकेसाठी यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड असे पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, या दोघांपैकी एकाची निवड करणे सोपे नाही. राहुलने यापूर्वी सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे, पण गेल्या काही काळापासून तो वनडेमध्ये ५ किंवा ६ व्या क्रमांकावर खेळत आला आहे. राहुल या वनडे मालिकेत मधल्या फळीत फलंदाजी करेल, अशी दाट शक्यता आहे.
यशस्वी जैस्वालने आतापर्यंत फक्त एकच वनडे सामना खेळला आहे. तो सामना फेब्रुवारी २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध नागपूर येथे झाला होता, ज्यात त्याने १५ धावा केल्या होत्या. तो काही मालिकांमध्ये बॅकअप ओपनर म्हणून संघात होता, पण त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही.
दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडने ६ वनडे सामने खेळले आहेत, त्यापैकी ४ सामन्यांत त्याने सलामीची जबाबदारी सांभाळली आहे. ऋतुराजने वनडेमध्ये १९.१६ च्या सरासरीने आणि एका अर्धशतकाच्या मदतीने ११५ धावा केल्या आहेत, ज्यात सलामीवीर म्हणून त्याच्या ९८ धावांचा समावेश आहे. ऋतुराजचे लिस्ट-ए क्रिकेटमधील आकडेही यशस्वीपेक्षा खूपच मजबूत आहेत.
ऋतुराज गायकवाड : ८९ सामने : ४५३४ धावा : ५७.३९ सरासरी : १७ शतके : २० अर्धशतके
यशस्वी जैस्वाल : ३३ सामने : १५२६ धावा : ५२.६२ सरासरी : ५ शतके : ७ अर्धशतके
ऋतुराज गायकवाडने ८९ लिस्ट-ए सामन्यांमध्ये ५७.३९ च्या उत्कृष्ट सरासरीने ४५३४ धावा केल्या आहेत. यात १७ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका-ए विरुद्धच्या अनऑफिशियल वनडे मालिकेत ऋतुराजने इंडिया-ए साठी सलामीला खेळताना ११७, ६८* आणि २५ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळी केल्या होत्या, जी त्याची उत्तम फॉर्म दर्शवते.
एकंदरीत विचार केल्यास, ऋतुराज गायकवाडचा सध्याचा फॉर्म त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत रोहित शर्मासोबत सलामी देण्यासाठीचा सर्वात मजबूत दावेदार बनवतो. भारतीय संघ व्यवस्थापनाने जर डाव्या-उजव्या हाताच्या फलंदाजांचे संयोजन वापरण्याचा निर्णय घेतला, तरच यशस्वी जैस्वालला संधी मिळू शकते.
जैस्वालला या वनडे मालिकेत कदाचित संधी मिळाली नाही तरी, त्याला भविष्यात तिन्ही फॉर्मेटचा (T20, ODI, Test) खेळाडू मानले जात आहे. रोहित शर्मा कदाचित २०२७ च्या वनडे विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेईल. अशा परिस्थितीत, जैस्वाल आणि शुभमन गिलची जोडी भविष्यातील सलामीसाठी एक सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.
केएल राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.