

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका संपल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांचे लक्ष ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिके लागले आहे. या बहुप्रतिक्षित मालिकेत भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याला एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
ऑस्ट्रे्लियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर आता किंग कोहली मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायला सज्ज झाला आहे. या मालिकेत चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा विराट आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीकडे लागलेल्या आहेत.
कोहलीचे एकदिवसीय क्रिकेटमधील दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे रेकॉर्ड नेहमीच प्रभावी राहिले आहे. त्याने आतापर्यंत आफ्रिकेविरुद्ध ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ६५.३९ च्या सरासरीने एकूण १५०४ धावा जमवल्या आहेत. या यादीत तो फक्त महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (२००१ धावा) मागे आहे.
मात्र, घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत कोहली सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहली : ४३५ धावा
राहुल द्रविड : ४४० धावा
विराट कोहलीला राहुल द्रविडला मागे टाकण्यासाठी फक्त ६ धावा करण्याची गरज आहे. जर तो या मालिकेत ६ किंवा त्याहून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला, तर तो द्रविडला मागे टाकून घरच्या मैदानावर द. आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनेल.
इतकेच नाही, तर कोहलीकडे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आणखी एका विक्रमात मागे टाकण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर सध्या संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत. दोघांच्या नावावरही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५-५ शतके आहेत. जर विराटने आगामी तीन सामन्यांच्या मालिकेत एकही शतक ठोकले, तर तो सचिनला मागे टाकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके करणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरेल.
एकाच मालिकेत दोन मोठे विक्रम करण्याची संधी मिळाल्याने, क्रिकेट रसिक 'किंग कोहली'च्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहण्यासाठी उत्सुक आहेत.