

गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक असाधारण आणि अनोखा विश्वविक्रम रचला आहे, जो यापूर्वी जगातील कोणत्याही कर्णधाराला साध्य करता आलेला नाही. या विक्रमामुळे त्याने क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले असून द. आफ्रिकेच्या क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेले आहे.
गुवाहाटी येथे झालेला कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेने ४०० हून अधिक धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. हा भारतासाठी लाजिरवाणा पराभव ठरला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसाठी हा विजय खूप दमदार राहिला. त्यांचा कर्णधार टेम्बा बावुमासाठी देखील हा विजय खूप खास ठरला. त्याने एक मोठा विक्रम आपल्या नाववार केला आहे. आपल्या कारकिर्दीतील पहिले १२ कसोटी सामने अजिंक्य राहणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कर्णधार ठरला.
या १२ कसोटी सामन्यांमध्ये बावुमाच्या नेतृत्वाखालील संघाने ११ सामने जिंकले आहेत, तर केवळ १ सामना अनिर्णित राहिला आहे.
यापूर्वी हा अद्भुत विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज लिंडसे हॅसेट यांच्या नावावर होता. या दोघांनीही त्यांच्या पहिल्या १२ कसोटी सामन्यांमध्ये १० विजय नोंदवले होते, पण बावुमाने आता ११ विजयांची नोंद करत त्यांना मागे टाकले आहे आणि नवा बेंचमार्क सेट केला आहे.
काही महिन्यांपूर्वी जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानच्या कसोटी दौऱ्यावर गेला होता, तेव्हा दुखापतीमुळे टेम्बा बावुमा या मालिकेत खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत एडन मार्करामने संघाचे नेतृत्व केले आणि त्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेला एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, बावुमाने कर्णधार म्हणून पुनरागमन करताच, त्याने संघाला पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर आणले.
बावुमाच्याच नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला नमवून विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (WTC) किताब जिंकला होता. अनेक वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने ICC चा मोठा खिताब आपल्या नावावर करण्याची ती पहिलीच वेळ होती. भारताविरिद्धच्या या ताज्या विजयासह, दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा WTC फायनलच्या शर्यतीत मजबूत दावेदार बनला आहे.
भारतामध्ये कसोटी सामना जिंकणे कोणत्याही विदेशी संघासाठी मोठे आव्हान असते. पण बावुमाच्या नेतृत्वाखालील द. आफ्रिकेच्या संघाने यावेळी तर भारतीय संघाचा सूपडा साफ केला आहे. या विजयामुळे त्यांनी सन २००० साली झालेल्या कसोटी मालिकेची आठवण ताजी केली. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत दारुण पराभव दिला होता. जवळपास २५ वर्षांपूर्वीचा इतिहास टेम्बा बावुमाने मोठ्या दिमाखात पुन्हा एकदा साकारला आहे. यापुढे टेम्बा बावुमाचा हा 'विजयरथ' असाच किती दिवस धडाक्यात सुरू राहतो, हे पाहणे क्रिकेट रसिकांसाठी निश्चितच खूप मनोरंजक असणार आहे.