

दुबई : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत करत विक्रमी नवव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, या संपूर्ण स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संघ तीन वेळा आमनेसामने आले आणि प्रत्येक वेळी भारताने विजय मिळवला. या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ट्रॉफी स्वीकारण्यावरून झालेल्या वादावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्स’ पोस्टवर देखील मनोगत व्यक्त केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक आशिया चषक विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने ‘एएनआयशी विशेष संवाद साधला. त्याने स्पष्ट केले की, ‘ही संपूर्ण स्पर्धा अपराजित राहून जिंकणे माझ्यासाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. विजेतेपदाची ट्रॉफी न घेणे हा माझ्यासाठी वादग्रस्त मुद्दा नव्हता. चांगला खेळ करून देशवासीयांचे आणि चाहत्यांचे मन जिंकले हीच खरी आमच्यासाठी ट्रॉफी आहे, असे विधान त्याने केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाच्या विजयानंतर केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) संदर्भातील ट्वीटवर सूर्यकुमार यादवने आपली प्रतिक्रिया दिली. त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘देशाचा नेता फ्रंटफुटवर राहून खेळाडूंना प्रोत्साहित करत असला की नक्कीच चांगला खेळ करण्याची जबाबदारी वाढते आणि त्यामुळे बळही मिळते.’
आशिया चषक 2025 मध्ये भारताने मिळवलेल्या शानदार विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करणारे ट्वीट केले होते. ‘खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल तोच, भारताचा विजय. आपल्या खेळाडूंचे अभिनंदन,’ असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले होते.
पंतप्रधानांच्या या ट्वीटवर कर्णधार सूर्यकुमार यादवने आनंद व्यक्त केला. ‘एएनआय'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, ‘जेव्हा देशाचा नेता स्वतः फ्रंटफुटवर फलंदाजी करतो, तेव्हा खेळाडूंचा आत्मविश्वास अधिक वाढतो.’
सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला, ‘देशाचा नेता स्वतः फ्रंटफुटवर खेळतो, तेव्हा खूप छान वाटते. जणू काही त्यांनी स्वतः स्ट्राइक घेऊन धावा केल्या. त्यांना अशा प्रकारे पाहणे अविश्वसनीय होते. जेव्हा पंतप्रधान मोदी समोर उभे असतात, तेव्हा खेळाडूही मोकळेपणाने खेळतात.’
सूर्याने पुढे नमूद केले की, ‘सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण देश विजय साजरा करत आहे. जेव्हा आम्ही भारतात परत येऊ, तेव्हा हे आणखी चांगले वाटेल आणि आम्हाला भविष्यात चांगली कामगिरी करण्यासाठी अधिक प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल.’
भारतीय संघाने आशिया चषक जिंकला असला तरी, त्यांनी ट्रॉफी स्वीकारली नाही. यावरून 28 सप्टेंबरच्या रात्री उशिरापर्यंत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. वस्तुतः, भारतीय संघाने पीसीबी (पाकिस्तान क्रिकेट बोर्ड) प्रमुख आणि एसीसी (आशियाई क्रिकेट परिषद) प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. नक्वी एसीसीचे प्रमुख असल्याने ते स्वतः ट्रॉफी देऊ इच्छित होते, परंतु भारताने यास नकार दिला. अखेरीस, भारतीय संघाने ट्रॉफीशिवायच बराच वेळ मैदानावर जल्लोष केला.