

Ind vs Pak Asia Cup : आशिया कप अंतिम सामन्यात भारताकडून नामुष्कीजनक पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. अंतिम सामन्यातील संपूर्ण सामन्याचे मानधन ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांना दान केली जाईल, अशी धक्कादायक घोषणा त्याने पत्रकार परिषदेत केली.
सलमानच्या या घोषणेमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेला दहशतवादी मसूद अझहरही मालामाल होण्याची शक्यता आहे. 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अझहरच्या कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले होते. याबाबत सलमान म्हणाला, "आमचा संघ मे महिन्यात भारताच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या आणि मुलांच्या कुटुंबांना अंतिम सामन्याची सामन्याचे मानधन दान करत आहे." 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केवळ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते. त्यामुळे, पाकिस्तानी खेळाडू मॅच फी दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांना देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला आहे.
"भारताने आशिया चषक स्पर्धेत केलेले वर्तन निराशाजनक होते. ते आमचा नाही तर क्रिकेटचा अनादर करत आहेत. चांगले संघ असे करत नाहीत, असा हास्यास्पद दावाही कर्णधार सलमान आघा याने केला. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान संघाशी हस्तांदोलन न करणे आणि अंतिम फेरीपूर्वीच्या फोटोशूटमध्ये भाग न घेणे यावर बोलताना खेळात औपचारिकता महत्त्वाची असते, असेही तो म्हणाला.
सलमानने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववरही बालिश आरोप केले. सूर्यकुमार वैयक्तिकरित्या हस्तांदोलन करतो, पण कॅमेऱ्यासमोर वेगळे वागतो, असे त्याने म्हटले. सलमानचे खोटे वक्तव्य समोर आले आहे. त्याने दावा केला होता की, टूर्नामेंटच्या सुरुवातीला सूर्यकुमारने त्याच्यासोबत हस्तांदोलन केले होते, पण कॅमेऱ्यासमोर तो वेगळा वागला. प्रत्यक्षात, सूर्यकुमारने आगासोबत कधीच हस्तांदोलन केले नव्हते, असे वृत्त समोर आले आहे.
सलमानने आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या लज्जास्पद कृतीचे समर्थन करतानाही पाहिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सलमान विसरला की नक्वी पीसीबी अध्यक्ष म्हणून नव्हे तर एसीसी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांच्या पदाची प्रतिष्ठा राखणे हे नक्वी यांचे कर्तव्य होते. सलमान म्हणाला की भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, म्हणून नक्वीने ती घेतली. तो म्हणाला, "जर तुम्ही ट्रॉफी घेतली नाही तर ते तुम्हाला कशी देतील? जे घडले ते त्याचेच परिणाम होते."