

ind vs pak asia cup final shivam dube won impact player medal
दुबई : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या (Asia Cup 2025) अंतिम सामन्यात पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत करत विक्रमी नवव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयानंतर संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे (Shivam Dube) याला ‘इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द मॅच’ (Impact Player of the Match) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांच्या ‘एक्स’ अकौंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवम दुबेला ‘इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द मॅच’चे पदक प्रदान करताना दिसत आहे.
बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये संघाचे फिजिओथेरपिस्ट कमलेश जैन यांनी शिवम दुबेला हे पदक प्रदान केले. पुरस्कार स्वीकारताना, दुबेने स्पष्टपणे सांगितले की, अंतिम सामन्यादरम्यान त्याने दबाव अनुभवला आणि तो घाबरला देखील होता.
व्हिडीओमध्ये, ड्रेसिंग रूममध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणतात की, आज कमलेश जैन हे इम्पॅक्ट प्लेयरच्या नावाची घोषणा करतील. त्यानंतर कमलेश जैन म्हणाले, ‘हे पदक देण्याचा आजचा दिवस किती खास आहे. एक मोठा दिवस, एक मोठा सामना आणि मोठी फायनल! या खेळाडूने संघाच्या गरजेनुसार थोडी वेगळी भूमिका निभावली. पहिले षटक टाकणे, पॉवरप्लेमध्ये दोन महत्त्वपूर्ण षटके टाकणे आणि संघाला गरज असताना चौकार-षटकार मारणे. आजचा इम्पॅक्ट प्लेयर' आहे शिवम दुबे.’
भारताला आशिया चषक जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शिवम दुबेने हे पदक जिंकल्यानंतर कबूल केले की, तो सामन्यादरम्यान दबावाखाली होता. तो म्हणाला, ‘हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे आभार मानतो. मी पहिले षटक टाकले. पण यावेळी 100 टक्के दबावाखाली होतो. मी खोटे बोलणार नाही, मी खूप घाबरलो होतो.’
दुबेचे हे बोल ऐकून बाजूला असलेले सहकारी खेळाडू ‘अरे, सत्य सांगायचे नाही’ असे ओरडले. हे ऐकून शिवम हसला आणि त्याने आपले मनोगत पुढे सुरू ठेवले. तो म्हणाला, ‘अनेक लोकांनी मला पाठिंबा दिला आणि सामन्यादरम्यान तो दबाव हळूहळू दूर झाला. खूप मजा आली. याबद्दल सर्वांचा आभारी आहे.’ यावेळी सहकारी खेळाडू टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहित करताना दिसले. ड्रेसिंग रूममधील हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अष्टपैलू शिवम दुबेने फायनलमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. गोलंदाजीमध्ये त्याने पॉवरप्लेदरम्यान दोन षटके टाकून केवळ 12 धावा दिल्या आणि एकूण 3 षटकांत 23 धावा दिल्या. याव्यतिरिक्त, फलंदाजीत त्याने तिलक वर्मासोबत पाचव्या विकेटसाठी 60 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
दुबेने 2019 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले आहे. तो भारतासाठी आतापर्यंत 34 सामने खेळला असून या सर्व लढती टीम इंडियाने जिंकल्या आहेत. कोणत्याही भारतीय खेळाडूसाठी ही विक्रमी कामगिरी आहे. त्यामुळे त्याला भारताचा ‘लकी चार्म’ (Lucky Charm) मानले जात आहे.