

IND vs NZ 2nd Test Day 2 : न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसर्या सामन्यातील दुसर्या दिवसाचा खेळा पूर्ण झाला असून, भारताने पहिल्या डावात ६ बाद ११६ धावा केल्या आहेत. तत्पूर्वी न्यूझीलंडचा पहिला डाव ३५६ धावांवर संपला होता. टीम इंडिया सध्या २४० धावांनी पिछाडीवर आहे. ध्रुव जुरेल ७ धावांवर नाबाद आहे.वॉशिंग्टन सुंदर (१० धावा) बाद झाल्यानंतर पंचांनी दिवसाचा खेळ थांबवण्याचा (स्टम्प्स) निर्णय घेतला.
न्यूझीलंडने शुक्रवारच्या ५ बाद २४६ धावांच्या पुढे खेळाला सुरुवात केली. मात्र पहिला डाव ३५६ धावांवर आटोपला. आकाश दीपने मॅट हेन्रीला बाद करून डाव संपवला. हेन्री २५ चेंडूत १९ धावा करून बाद झाला. यासह, आकाश दीपने कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा एका डावात पाच बळी (फाईव्ह-विकेट हॉल) घेतल्या. त्याने ३१.३ षटकांत ९९ धावा देऊन ५ बळी टिपले.
यानंतर पहिल्या डावात न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांच्या भेदक मार्यासमोर भारतीय फलंदाजांजी भंबेरी उडाली. डावाच्या पहिल्याच षटकात मॅट हेन्रीने यशस्वी जैस्वालला क्लिन बोल्ड केले; जैस्वालला खातेही उघडता आले नाही.
त्यानंतर, देवदत्त पडिक्कलने केएल राहुलसोबत मिळून डाव सावरण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी काईल जेमिसनने तोडली; त्याने पडिक्कलला यष्टीरक्षक ब्लंडेलकडे झेल देण्यास भाग पाडले. एक चौकार आणि एका षटकार फटकावत पडिक्कलने २० चेंडूंत २१ धावा केल्या,
जेमिसनने कर्णधार शुभमन गिलची विकेट घेतली, ज्याला टॉम लॅथमने झेलले. गिलने २९ चेंडूंत १७ धावा केल्या, ज्यात तीन चौकारांचा समावेश होता. त्याने आणि राहुलने २६ धावांची भागीदारी केली होती.
त्यानंतर ऋषभ पंत फलंदाजीला आला. त्याने काही आक्रमक फटके खेळले, परंतु मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट गमावली. पंतने १ चौकार, १ षटकार फटकावत ३९ चेंडूंत २३ धावा केल्या. त्याने आणि राहुलने ३७ धावांची भागीदारी केली. जेकब डफीच्या गोलंदाजीवर जेमिसनने झेल पकडत पंतला तंबूत धाडले. यानंतर डफीने केएल राहुलला कॉनवेकडे झेल देण्यास भाग पाडले. राहुलने ८० चेंडूंत २५ धावा केल्या.
सुंदर आणि जुरेल यांनी सावधपणे फलंदाजी केली. ९१ चेंडूचा सामना करत त्यांनी १२ धावा. अखेरीस, नॅथन स्मिथच्या गोलंदाजीवर लॅथमने सुंदरला झेलबाद केले आणि त्याला तंबूत परत पाठवले. सुंदरने १० धावा केल्या.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने भारतासाठी ही कसोटी जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पराभव किंवा अनिर्णित निकाल लागल्यास, भारत अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल.