

राजकोट : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी उभय संघ सज्ज झाले आहेत. मंगळवारी, १४ जानेवारी रोजी राजकोट येथे हा सामना रंगणार असून, भारतीय संघाच्या अंतिम अकरा (Playing XI) खेळाडूंमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
तीन सामन्यांच्या या मालिकेत टीम इंडिया सध्या १-० ने आघाडीवर आहे. राजकोटमधील सामना जिंकल्यास भारतीय संघ मालिकेवर कब्जा करेल आणि तिसरा सामना केवळ औपचारिक ठरेल. मात्र, या निर्णायक लढतीपूर्वी भारतीय संघात निवडीचा पेच निर्माण झाला असून, हा बदल रणनीतीपेक्षा 'अपरिहार्यता' अधिक असल्याचे दिसत आहे.
पहिल्या सामन्यात खेळलेला अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे उर्वरित दोन सामन्यांतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने (BCCI) त्याच्या जागी युवा खेळाडू आयुष बदोनीचा संघात समावेश केला आहे. मात्र, बदोनीला पहिल्यांदाच भारतीय संघात पाचारण करण्यात आल्याने, त्याला थेट अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची शक्यता धुसर आहे.
वॉशिंग्टन सुंदरच्या अनुपस्थितीत अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी हा निवडीसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. पहिल्या सामन्यात संघाने तीन फिरकीपटूंना प्राधान्य दिल्याने नितीशला संधी मिळाली नव्हती. परंतु, आता संघ समतोल राखण्यासाठी त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो. नितीश फलंदाजीसोबतच मध्यमगती गोलंदाजीचा पर्यायही उपलब्ध करून देतो.
गोलंदाजीच्या आघाडीवरही बदलाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा या वेगवान त्रिकुटाने धुरा सांभाळली होती. हर्षित राणाने अष्टपैलू कामगिरीने प्रभावित केले असले, तरी प्रसिद्ध कृष्णाला धावा रोखण्यात अपयश आले. कृष्णाने २ बळी घेतले असले तरी ९ षटकांत ६० धावा खर्च केल्या होत्या. अशा परिस्थितीत डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला अंतिम अकरामध्ये स्थान दिले जाऊ शकते.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.