

भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला असून शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली एका नव्या पर्वाला सुरुवात करत आहे. ऋषभ पंत उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. 20 जूनपासून टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) नव्या चक्राची सुरुवात करेल.
ही मालिका भारतीय क्रिकेटमधील एका स्थित्यंतराची नांदी मानली जात आहे. कारण रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या त्रिकुटांच्या कसोटी निवृत्तीनंतरची ही पहिलीच मालिका आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही निवड समितीने संघात स्थान दिलेले नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराहवर वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणाचे संपूर्ण नेतृत्व असणार आहे. त्याला मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्याकडून भक्कम साथीची गरज असेल.
आकडेवारीवर नजर टाकल्यास, रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमी यांनी इंग्लंडमध्ये नेहमीच प्रभावी कामगिरी केली आहे. विराटने 33.2 च्या सरासरीने 1096 धावा केल्या आहेत, तर रोहित शर्माच्या नावावर 524 धावा आहेत. अश्विनने अष्टपैलू खेळ करत 18 बळी आणि 261 धावांची नोंद केली आहे, तर मोहम्मद शमीने इंग्लंडच्या भूमीवर 42 बळी टिपले आहेत. या अनुभवी खेळाडूंची उणीव भारतीय संघाला नक्कीच जाणवेल, यात शंका नाही.
शुभमन गिल या नव्या जबाबदारीसाठी सज्ज असला तरी, त्याच्यासमोर आव्हान मोठे आहे. गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कसोटी संघ स्थित्यंतरातून जात असून, आता त्यांना निकाल देण्याची वेळ आली आहे. भारताने 2007 नंतर इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे गिल-गंभीर ही जोडी तब्बल 18 वर्षांचा हा दुष्काळ संपवू शकेल का? हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
इंग्लंडच्या धर्तीवर भारताने अखेरची कसोटी मालिका 2007 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली जिंकली होती. त्यावेळी तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने 1-0 असा विजय मिळवला होता. त्यानंतर भारतीय संघाने चार वेळा इंग्लंडचा दौरा केला, परंतु त्यांना विजयाची चव चाखता आली नाही.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव.