

IND vs ENG T20 World Cup Semi Final: टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारत आणि इंग्लंड आमनेसामने येणार आहेत. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ही लढत रंगणार आहे. विशेष म्हणजे सलग तिसऱ्यांदा हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2022 मध्ये इंग्लंडने भारताचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आणि पुढे विजेतेपदही पटकावले. तर 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडचा बदला घेतला आणि अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रीकेला पराभूत करत ट्रॉफी जिंकली.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड आतापर्यंत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. या पाच सामन्यांपैकी इंग्लंडने फक्त दोन वेळा विजय मिळवला आहे, तर उर्वरित लढती भारताच्या नावावर आहेत.
या सामन्यांमधील सर्वांच्या लक्षात राहणारा क्षण 2007च्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळाला. त्या सामन्यात युवराज सिंहने सहा चेंडूत सहा षटकार ठोकत इतिहास रचला होता. एंड्रयू फ्लिंटॉफशी झालेल्या वादानंतर युवराजने स्टुअर्ट ब्रॉडला सलग सहा षटकार मारत विक्रम केला होता. तो सामना आजही भारतीय चाहत्यांच्या लक्षात आहे.
Head-To-Head India England
Wins 3 2
Losses 2 3
नॉकआऊट टप्प्यातील लढतींमध्ये दोन्ही संघांमध्ये बरोबरीची टक्कर दिसून येते. गेल्या दोन उपांत्य सामन्यांत प्रत्येकी एक विजय मिळाल्याने आकडेवारी 1-1 अशी आहे. विशेष बाब म्हणजे, या दोन्ही सामन्यांतील विजेता संघ पुढे जाऊन स्पर्धेचा विजेता ठरला आहे. त्यामुळे यंदाच्या सामन्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.
Head-To-Head India England
Wins 1 1
Losses 1 1
मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे रंगणारा हा सामना अंतिम फेरी गाठण्यासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांकडे अनुभवी खेळाडू आणि आक्रमक फलंदाज आहेत. भारत घरच्या मैदानावर खेळत असल्याचा फायदा घेऊ शकतो, तर इंग्लंडकडे मोठ्या सामन्यांचा अनुभव आहे.
आकडेवारी पाहता भारत आघाडीवर असला तरी नॉकआऊट टप्प्यातील निकाल पाहता सामना अत्यंत चुरशीचा होण्याची शक्यता आहे. मागील दोन स्पर्धांचा इतिहास सांगतो की, या लढतीतील विजेता संघ अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावतो. म्हणूनच वानखेडेवरील ही लढत केवळ सेमीफायनल नसून संभाव्य विजेता ठरवणारी आहे. क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता या महत्त्वाच्या सामन्याकडे लागले आहेत.