
टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी आज भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले आहेत. क्रिकेटच्या मैदानावर यापेक्षा मोठा थरार असूच शकत नाही. समीकरण अगदी स्पष्ट आहे; जो जिंकेल तो संघ दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंडसोबत अंतिम चारमध्ये सामील होईल. विशेष म्हणजे, दोन्ही संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत केवळ एकदाच पराभवाची चव चाखली आहे आणि तीही 'सुपर ८' मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. या पराभवामुळेच आजच्या सामन्याला 'व्हर्च्युअल कॉर्टर फायनल'चे स्वरूप प्राप्त झाले आहे. आजच्या लढतीत 'नेट रन रेट'ची गणिते गौण ठरणार असून, निव्वळ विजयच दोन्ही संघांना पुढचा मार्ग मोकळा करून देणार आहे.
सुरुवातीला या सामन्यावर पावसाचे सावट असल्याची चर्चा होती, ज्याचा फायदा वेस्ट इंडिजला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ताज्या हवामान अंदाजानुसार पावसाची शक्यता कमी असून, चाहत्यांना एका पूर्ण आणि चुरशीच्या सामन्याचा आनंद घेता येईल. घरच्या मैदानावर खेळण्याचा आणि प्रेक्षकांच्या उदंड पाठिंब्याचा फायदा भारतीय संघाला नक्कीच मिळेल. परंतु, २०१६ च्या विश्वचषक उपांत्य फेरीत वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजने भारताला दिलेला धक्का विसरून चालणार नाही.
भारतीय संघ या निर्णायक सामन्यासाठी पूर्ण आत्मविश्वासाने सज्ज आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा फॉर्मात परतल्याने भारताची चिंता मिटली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने ठोकलेले झंझावाती अर्धशतक आणि पॉवरप्लेमधील त्याची आक्रमकता भारतासाठी जमेची बाजू ठरेल. दुसरीकडे, संजू सॅमसनच्या पुनरागमनाने फलंदाजीची फळी अधिक मजबूत झाली आहे. त्याने आपल्या छोटेखानी पण स्फोटक खेळीतून मधल्या फळीसाठी भक्कम पाया रचून दिला आहे.
गेल्या काही सामन्यांतील स्ट्राईक रेटवरून टीका होत असलेल्या तिलक वर्माने आपल्या बॅटनेच उत्तर दिले आहे. त्याने अवघ्या १६ चेंडूत ३ चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावा कुटल्या. हार्दिक पांड्यासोबत त्याने डावाच्या अखेरीस केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.
वेस्ट इंडिजने या स्पर्धेत एक साचेबद्ध पण यशस्वी रणनीती अवलंबली आहे. पहिले १० षटके संयमाने खेळून हाताशी विकेट राखणे आणि शेवटच्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडणे, हा त्यांचा आजवरचा फॉर्म्युला राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकमेव पराभव वगळता त्यांनी सलग ५ विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजीची खोली अफाट आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८३ धावांत ७ गडी बाद झालेले असतानाही, नवव्या क्रमांकावर आलेल्या रोमारियो शेफर्डने जिगरबाज अर्धशतक झळकावून संघाला १७६ धावांपर्यंत पोहोचवले होते. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना शेवटच्या चेंडूपर्यंत सावध राहावे लागणार आहे.