

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना गुरुवारी (३१ जुलै)पासून लंडनच्या ऐतिहासिक ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या सामन्याकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि खेळपट्टी क्युरेटर यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर, कर्णधार शुभमन गिलने अखेर आपले मत व्यक्त केले आहे.
२९ जुलै रोजी ओव्हल कसोटीच्या तयारीसाठी भारतीय संघ सरावाकरिता मैदानावर पोहोचला असता, संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि खेळपट्टी क्युरेटर यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे वृत्त समोर आले. या घटनेने समाजमाध्यमे आणि क्रीडाविश्वात मोठी खळबळ उडवून दिली. सामन्याच्या एक दिवस आधी आयोजित पत्रकार परिषदेत, भारतीय कर्णधार शुभमन गिलला याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता, त्याने अत्यंत संयमित प्रतिक्रिया दिली.
गिल म्हणाला, ‘माझ्या माहितीनुसार, आम्हाला खेळपट्टीपासून २.५ मीटर अंतर राखण्याबाबत कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती. जर आम्हाला इतके मागे थांबून सराव करायचा असेल, तर आम्ही तो कसा करणार? मला या वादावर अधिक काही भाष्य करायचे नाही. सामन्याची तयारी करणे हे आमचे प्राधान्य आहे आणि आम्ही त्यावरच लक्ष केंद्रित करत आहोत.’
दोन कसोटी सामन्यांमधील विश्रांतीचा कालावधी कमी असण्याबाबत विचारले असता, गिलने ही संपूर्ण मालिका अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक असल्याचे म्हटले.
तो म्हणाला, ‘या मालिकेतील आतापर्यंतचे सर्व सामने पाचव्या दिवसाच्या अंतिम सत्रापर्यंत चालले आहेत. अखेरचे असे कधी घडले होते, हे मला आठवत नाही. जर दोन सामन्यांमधील कालावधी जास्त ठेवला असता, तर हा दौरा आणखी लांबला असता.’
ओव्हल कसोटीसाठी जसप्रीत बुमराहच्या संभाव्य पुनरागमनाबाबतही गिलला प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने स्पष्ट केले की अंतिम निर्णय सामन्याच्या दिवशी सकाळी घेतला जाईल. तो म्हणाला, ‘आम्ही गुरुवारी सकाळी खेळपट्टीची पाहणी करून अंतिम निर्णय घेऊ. आज आम्ही जेव्हा खेळपट्टी पाहिली, तेव्हा ती बरीच हिरवीगार दिसत होती.’
दुसरीकडे, इंग्लंड संघाने या सामन्यासाठी आपल्या अंतिम 11 खेळाडूंची (प्लेइंग इलेव्हन) घोषणा केली आहे. कर्णधार बेन स्टोक्ससह चार खेळाडूंना संघातून वगळण्यात आले आहे. चार प्रमुख वेगवान गोलंदाज या सामन्यात खेळताना दिसतील. यावरून हे स्पष्ट होते की, वेगवान गोलंदाजांच्या बळावरच हा कसोटी सामना जिंकण्याची रणनीती इंग्लंडने आखली आहे.