

Team India once again declined to play against Pakistan in WCL semifinals
‘वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स’ (WCL 2025) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत चॅम्पियन्स संघाने पाकिस्तान चॅम्पियन्स संघाविरुद्ध खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. हा सामना गुरुवारी (दि. 31) नियोजित होता. पाकिस्तानविरुद्ध कोणताही सामना खेळण्याची इच्छा नसल्याचे भारतीय संघाने म्हटले आहे.
भारत चॅम्पियन्स संघाने मंगळवारी (दि. 29) वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघाचा अवघ्या 13.2 षटकांत पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. तथापि, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत संघाने आधीच आपला आक्षेप नोंदवला होता. यापूर्वी, साखळी फेरीतील भारत-पाकिस्तान सामनादेखील खेळाडू आणि स्पर्धेच्या एका प्रमुख प्रायोजकाने विरोध दर्शवल्यामुळे रद्द करण्यात आला होता.
माध्यमांतील वृत्तानुसार, स्पर्धेची प्रायोजक असलेल्या ‘ईझमायट्रिप’ (EaseMyTrip) या कंपनीनेदेखील उपांत्य फेरीच्या सामन्यातून माघार घेतली आहे. कंपनीचे सह-संस्थापक निशांत पिट्टी यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही भारतीय नागरिकांच्या भावनांचा आदर करत या सामन्यातून माघार घेत आहोत.’ त्यांच्या मते, ‘दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र नांदू शकत नाहीत.’
भारताचे माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांनीही पाकिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक झाली होती. त्यांना पहिल्या तीन सामन्यांत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. पाकिस्तानविरुद्धचा साखळी सामना रद्द झाला होता, तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतरच भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उल्लेखनीय आहे की, अनेक खेळाडूंनी सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारताने साखळी फेरीतही पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळला नव्हता. या बहिष्काराची सुरुवात करणाऱ्यांमध्ये शिखर धवन आणि हरभजन सिंग हे प्रमुख खेळाडू होते.
धवनने सोशल मीडियावर एक जुना ईमेल शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांचा हवाला देत आपण पाकिस्तानविरुद्ध कोणताही सामना खेळणार नाही, असे WCL आयोजकांना पूर्वीच कळवले होते.