

icc womens world cup final new champion after 25 years
३० दिवसांच्या थरारक आणि काही अनपेक्षित निकालांनी भरलेल्या रंगतदार सामन्यांनंतर, अखेर आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीतील संघ निश्चित झाले आहेत. रविवार, २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या महाअंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषकाच्या किताबासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
गुरुवारी (दि. ३०) भारतीय संघाने दुसऱ्या उपांत्य फेरीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक आणि विश्वविक्रमी विजय मिळवला. यासह निकालासह हे निश्चित झाले की, २५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महिला क्रिकेटला एक नवा विश्वविजेता संघ मिळणार.
विश्वचषक स्पर्धेची सुरुवात ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने झाली होती आणि आता ३० ऑक्टोबरला डीवाय पाटील स्टेडियमवर स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३३८ धावांचा विशाल डोंगर उभा केला. मात्र, जेमिमा रॉड्रिग्जच्या विक्रमी शतकाच्या आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अविस्मरणीय खेळीच्या बळावर भारतीय संघाने हा सामना ५ गडी राखून जिंकला आणि दिमाखात अंतिम फेरीत स्थान मिळवले.
आता महाअंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. आफ्रिकन संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारतीय संघ तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी, संघाने २०१७ मध्ये आपला शेवटचा अंतिम सामना खेळला होता, तर सर्वप्रथम २००५ मध्ये भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. मात्र, मागील दोन्ही अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचे दुःख सहन करावे लागले आहे. २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाने, तर २०१७ मध्ये विजय अगदी हातातोंडाशी आलेला असतानाही, इंग्लंडने टीम इंडियाला पराभूत केले होते.
याउलट, दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. यापूर्वी २०१७ आणि २०२२ मध्ये, दोन्ही वेळा त्यांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. पण या वेळी लॉरा वोल्वार्टच्या नेतृत्वाखालील आफ्रिकी संघाने आपला मागील हिशेब चुकता केला आहे.
महिला विश्वचषक २०२५ च्या स्पर्धेचा अंतिम सामना विशेष महत्त्वाचा आहे, कारण महिला क्रिकेटला नवीन विश्वविजेता मिळणार आहे. तब्बल २५ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत एका नवीन विजेत्याचा फैसला होणार आहे. यापूर्वी विश्वचषक २००० मध्ये असे घडले होते, जेव्हा न्यूझीलंडने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून पहिला आणि एकमेव किताब जिंकला होता. त्यापूर्वी आणि त्यानंतरही केवळ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांचे वर्चस्व राहिले आहे. दरम्यान यंदाच्या ऐतिहासिक अशा अंतिम सामन्यातून महिला क्रिकेटला चौथी विश्वविजेती टीम गवसणार आहे.
भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील वरिष्ठ क्रिकेटमधील हा केवळ दुसराच विश्वचषक अंतिम सामना असेल. यापूर्वीचा अंतिम सामना २०२४ मध्ये पुरुषांच्या टी-२० विश्वचषकात खेळला गेला होता, ज्यात भारताने खिताब जिंकला होता. महिला क्रिकेटचा विचार केल्यास, याच वर्षी १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकात भारत आणि द. आफ्रिका यांच्यात लढत झाली होती, ज्यात भारताने बाजी मारली होती.
अशा प्रकारे, सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत भारत-द. आफ्रिका यांच्यातील हा तिसरा विश्वचषक अंतिम सामना असणार आहे. या विश्वचषकाचा विचार केल्यास, दोन्ही संघांमध्ये लीग स्टेजमध्ये लढत झाली होती, ज्यात द. आफ्रिकेने थरारक विजय मिळवला होता. त्यामुळे अंतिम सामना अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे.