

महिला विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये भारताने सात वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा रोमांचक लढतीत पराभव केला. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयाची शिल्पकार ठरली जेमिमा रॉड्रिग्ज. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुरुवारी (दि. ३०) झालेल्या या सामन्यात जेमिमाने केवळ १३४ चेंडूंमध्ये नाबाद १२७ धावांची अविस्मरणीय खेळी करत भारताला ३३९ धावांचे मोठे आणि विक्रमी लक्ष्य यशस्वीरित्या गाठण्यात सिंहाचा वाटा उचलला. भारताने पाच गडी आणि नऊ चेंडू बाकी असताना या सामना जिंकला. या विजयासह भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.
३३९ धावांचा हा पाठलाग महिला एकदिवसीय क्रिकेटमधील आजवरचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला आहे. जेमिमाच्या या उत्कृष्ट आणि करिअर-डिफायनिंग कामगिरीची दखल खुद्द भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीनेही घेतली आहे. या दिग्गज भारतीय फलंदाजाने २५ वर्षीय जेमिमाच्या प्रयत्नांना सोशल मीडियावर सलाम करत तिची प्रशंसा केली आहे. तसेच संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
कोहलीने शुक्रवारी (दि. ३१) सकाळी ‘एक्स’ या सोशल मीडियावर हरमनप्रीत कौरच्या संघाचे अभिनंदन केले. तसेच, त्याने जेमिमाला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी खास प्रोत्साहन दिले. त्याने पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘‘ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य प्रतिस्पर्धकाविरुद्ध आमच्या संघाने किती मोठा विजय मिळवला आहे! मुलींनी केलेला हा ऐतिहासिक ‘रन चेस’ शानदार ठरला. अशा हायव्होल्टेज सामन्यात जेमिमाची कामगिरी अत्यंत लक्षवेधी ठरली आहे. तिच्या खेळीत लवचिकता, आत्मविश्वास आणि तीव्र जिद्दीचा अविष्कार दिसला. शाबास, टीम इंडिया,” अशा भावना कोहलीने व्यक्त केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा विजय अविस्मरणीय ठरला. कांगारू संघाने २०१७ च्या उपांत्य फेरीनंतर विश्वचषक स्पर्धेत एकही सामना गमावला नव्हता. यंदाच्या स्पर्धेत ऑसी संघाने साखळी फेरीत अॅलिसा हिलीच्या नेतृत्वाखालील विशाखापट्टणम येथे ३३१ धावांचे आव्हान पूर्ण करून भारताला पराभूत केले होते. नवी मुंबईतील उपांत्य फेरीपूर्वी, भारताच्या कामगिरीबद्दल फारसे कोणालाच आशादायक वाटत नव्हते. संघाने साखळी टप्प्यात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध सलग तीन सामने गमावले होते.
२५ वर्षीय जेमिमाची विश्वचषकाची सुरुवात चांगली झाली नव्हती. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ती सपशेल अपयशी ठरली होती. ज्यामुळे तिला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आले होते. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी तिला पुन्हा संघात स्थान देण्यात आले. त्या सामन्यात तिने ५० धावांचा टप्पा ओलांडला. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत तिने आपली सर्वोत्तम खेळी साकारली. नाबाद शतक झळकावून तिने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले.
या निर्णायक सामन्यात जेमिमाने हरमनप्रीतसोबत तिसऱ्या विकेटसाठी १६७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. कर्णधार हरमनप्रीत ८९ धावा करून बाद झाली, पण जेमिमा मैदानावर शेवटपर्यंत पाय रोवून उभी राहिली. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी (२ नोव्हेंबर) अंतिम सामना रंगणार आहे.