Jemimah Rodrigues

Jemimah Rodrigues : २०१७ मधील ‘फॅनगर्ल’ ते २०२५ ची ‘फिनिशर’!

Women's World Cup : जेमिमाने ज्या हरमनला पाहून बॅट हातात घेतली, तिच्याच साथीने बनली विजयाची शिल्पकार
Published on

क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव सहसा होत नाही आणि महिला क्रिकेटमध्ये तर तो जवळजवळ अपवादात्मकच असतो. पण, २०१७ मध्ये भारताने काहीतरी असे करून दाखवले, ज्यामुळे संपूर्ण जग अचंबित झाले होते. २०१७ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीत, ब्रिस्टल येथे, भारताने ऑस्ट्रेलियाची सलग २६ सामन्यांची विजयी मालिका मोडीत काढली होती. त्या दिवशी हरमनप्रीत कौरने साकारलेली १७१ धावांची ऐतिहासिक खेळी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमस्वरूपी कोरली गेली.

त्याच दिवशी, मुंबईत, १६ वर्षांची जेमिमा रॉड्रिग्स टीव्हीसमोर बसून ती मॅच पाहत होती. खरेतर ती सुरुवातीला हॉकीची राष्ट्रीय खेळाडू होती, पण तिने हॉकी सोडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला होता. २०१७ मधील त्या सामन्यात हरमनने जेव्हा ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाजांवर षटकार ठोकला, तेव्हा जेमिमाच्या मनात काहीतरी पेटून उठले. जसे १९८३ च्या कपिल देवच्या संघाने सचिन तेंडुलकरला प्रेरित केले, तसेच २०१७ मध्ये हरमनप्रीतच्या खेळीने जेमिमाला एक स्वप्न दिले. जेमिमाने मनोमन निश्चय केला, ‘एक दिवस मीसुद्धा अशीच कामगिरी करून दाखवेन.’

Jemimah Rodrigues
Kohli Loves Jemimah Innings : जेमिमाच्या खेळीपुढे किंग कोहलीही नतमस्तक! म्हणाला; ‘आत्मविश्वास आणि तीव्र जिद्दीचा अविष्कार..’

२०१७ मध्ये केले होते भारतीय संघाचे स्वागत

काही दिवसांनंतर, मुंबई विमानतळावर तीच जेमिमा तिरंगा फडकावत 'टीम इंडिया'चे स्वागत करत होती. भारत लॉर्ड्सवर अंतिम सामना हरला असला तरी, जेमिमाच्या दृष्टीने ते अजिबात पराभूत झाले नव्हते. त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये एक नवी ज्योत प्रज्वलित केली होती. बॅट हातात घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलीला प्रेरणा दिली.

ऑस्ट्रेलियाचा प्रतिशोध आणि जेमिमाचे आव्हान

२०१७ चा तो उपांत्य सामना केवळ भारतासाठी अभिमानास्पद नव्हता, तर ऑस्ट्रेलियासाठीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरला. पराभवानंतर त्यांनी स्वतःला आणखी मजबूत केले. त्यांनी पुढे २०२२ चा विश्वचषक सहज जिंकला. त्यानंतर ते २०२५ पर्यंत या स्पर्धेत सलग १५ सामने जिंकून अजिंक्य राहिले होते. पण, इतिहासाची पुनरावृत्ती होणार होती. २०१७ मध्ये हरमनने चमत्कार केला आणि २०२५ मध्ये तीच कहाणी जेमिमाने पुन्हा लिहिली.

Jemimah Rodrigues
Team India entered World Cup Final : भारताच्या रणरागिणींचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाची नांगी ठेचून फायनलमध्ये धडक

'हॅरी दी' सोबत जेमिमाची अभेद्य जोडी

नवी मुंबई येथे गुरुवारी झालेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा प्रबळ दावेदार होते. त्यांनी गट साखळीत भारताविरुद्धचे ३३१ धावांचे लक्ष्य यशस्वीपणे पार केले होते, पण यावेळी काहीतरी असामान्य घडले. जी मुलगी एकेकाळी विमानतळावर ध्वज फडकावत होती, ती आता बॅट घेऊन उभी होती. २५ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्सने नाबाद १२७ धावांची स्फोटक खेळी करत ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर काढले आणि भारताला अंतिम फेरीत पोहोचवले.

२०१७ मध्ये हरमनप्रीतला डोळ्यासमोर ठेवून जेमिमाने स्वप्न पाहिले. त्या या मुंबईच्या मुलीला आता मैदानावर हरमनप्रीत सोबत क्रीजवर उभी राहिली. ऑस्ट्रेलियाने ३३८ धावांचा डोंगर उभारला होता. शेफाली वर्मा, स्मृती मानधना लवकर बाद झाल्या आणि सगळ्यांना वाटले आता स्वप्न भंगले. पण जेमिमा आणि हरमनप्रीतने एकत्र येऊन चमत्कार घडवला. या दोघींनी १६७ धावांची विक्रमी भागीदारी रचली, जी विश्वचषक इतिहासात ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वात मोठी भागीदारी ठरली.

हरमनप्रीत काय म्हणाली?

सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली, ‘आम्ही एकमेकींना खूप चांगली साथ दिली. सतत संवाद साधत होतो. जेमिमा मला प्रत्येक ओव्हरनंतर आपण किती धावा केल्या आहेत आणि पुढे किती पाहिजेत हे सांगत होती. ती स्वतःला व मलासुद्धा प्रोत्साहन देत होती. जेमिमाने स्वतःला ज्या प्रकारे सांभाळले, त्याचे बरेचसे श्रेय हे तिलाच जाते.’

हरमनप्रीत ८९ धावांवर बाद झाली, तेव्हा भारताला विजयासाठी आणखी ११३ धावांची गरज होती. यानंतर संपूर्ण जबाबदारी जेमिमाच्या खांद्यावर होती आणि तिने मागे वळून पाहिले नाही.

थकलेली, पण निश्चयी योद्धी

रॉड्रिग्सने १२७ धावांपैकी ७१ धावा धावून काढल्या. तिने आपल्या खेळीत एकही षटकार मारला नाही. ती स्वतःसाठी आणि आपल्या पार्टनरसाठी धावत होती. जेव्हा अमनजोत कौरने ४९ व्या ओव्हरमध्ये विजयी चौकार मारला, तेव्हा जेमिमा पिचच्या मध्यभागी गुडघ्यांवर खाली बसली. अश्रू, विजयाचा आनंद आणि एक पूर्ण झालेले स्वप्न, हे सर्व तिच्या मनात एकाच वेळी दाटून आले होते.

मानसिक लढा आणि आत्मविश्वासाची पुनर्प्राप्ती

या विश्वचषकात जेमिमाने केवळ गोलंदाजांशी नाही, तर आपल्या आतल्या भीतीशीही लढा दिला. तिला मिताली राजची उत्तराधिकारी मानले जात होते, पण सुरुवातीच्या अपयशानंतर तिला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून वगळण्यात आले. ती रात्रभर फोनवर आपल्या आईशी बोलत असे, रडत असे, स्वतःवर शंका घेत असे, पण तिने हार मानली नाही. ती पुन्हा मैदानात उतरली आणि न्यूझीलंडविरुद्ध ७० धावांची खेळी करून परतली; आणि येथूनच तिच्या पुनरागमनाची कहाणी सुरू झाली.

'सिद्ध करण्यासाठी नाही, तर संघासाठी खेळायचे'

सामन्यानंतर जेमिमा म्हणाली, ‘जेव्हा मला मागील विश्वचषकातून वगळण्यात आले, तेव्हा मी निश्चय केला की, आता मी स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही, तर संघाला जिंकवण्यासाठी खेळणार. कारण स्वतःला सिद्ध करण्याची मानसिकता कधीच मदत करत नाही.’ तिची ही ओळ अपयशाशी झगडणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी एक प्रेरणादायी संदेश आहे.

'रील्स क्वीन' पासून 'रन मशीन' पर्यंत

जेमिमाचे करिअर एका रोलर-कोस्टरसारखे राहिले आहे. २०१८ मध्ये जेव्हा ती पहिल्यांदा प्रकाशात आली, तेव्हा सगळे म्हणाले, 'नेक्स्ट बिग थिंग'. पण वेळेनुसार टीकाही झाली. लोक म्हणू लागले, ‘ती क्रिकेटर कमी, सोशल मीडिया स्टार जास्त आहे.’ तिची प्रत्येक रील, प्रत्येक गाणे टीकेचे धनी बनले, पण जेमिमाने उत्तर बॅटने दिले. तिने स्वतःला पुन्हा घडवले. मेहनत, आत्मविश्वास आणि श्रद्धेच्या बळावर ती उभी राहिली. २०२५ मध्ये पहिले एकदिवसीय शतक ठोकण्यासाठी तिने किती छान प्लॅटफॉर्म निवडला आणि हाच तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news