
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने आयसीसी महिला एकदिवसीय खेळाडूंच्या क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. यासह तिने तब्बल 6 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे. मंगळवारी (दि. 17) आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत स्मृतीने द. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टला मागे टाकले. वोल्वार्ड्टने 19 रेटिंग गमावल्याचा थेट फायदा स्मृतीला झाला आणि 2019 नंतर प्रथमच भारतीय खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज बनली आहे.
स्मृती मानधनाच्या खात्यात सध्या 727 रेटिंग जमा झाले आहेत. तिच्यापाठोपाठ इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट 719 रेतिंगसह दुसऱ्या स्थानी आहे, तर लॉरा वोल्वार्ड्टची 719 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. स्मृती मानधनानंतर या यादीत भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर या अनुक्रमे 14व्या आणि 15व्या स्थानावर आहेत.
भारतीय सलामीवीर स्मृती मानधना सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. तिने नुकत्याच कोलंबो येथे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात शानदार शतक झळकावले होते. या कामगिरीमुळे तिला आपल्या क्रमवारीत मोठी झेप घेण्यास मदत झाली. स्मृती मंधाना टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीतही चौथ्या स्थानी आहे.
गेल्या काही काळापासून स्मृती एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत अव्वल 10 मध्ये सातत्याने स्थान टिकवून होती, परंतु 2019 च्या सुरुवातीपासून तिला अव्वल स्थान गाठता आले नव्हते. आता तिने हा दुष्काळ संपवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या टॅझमिन ब्रिट्सने पाच स्थानांची झेप घेत 27वे स्थान गाठले आहे, तर सुने लुस सात स्थानांनी पुढे जाऊन 42व्या स्थानी पोहोचली आहे. वेस्ट इंडिजच्या शेमाइन कॅम्पबेल (सात स्थानांचा फायदा, 62व्या स्थानी) आणि कियाना जोसेफ (12 स्थानांचा फायदा, 67व्या स्थानी) यांनाही क्रमवारीत फायदा झाला आहे.
वेस्ट इंडिजची अनुभवी फिरकी गोलंदाज एफी फ्लेचर एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत आपल्या संघातील सर्वोत्तम गोलंदाज ठरली आहे. तिने केव्ह हिल येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चार बळी घेत 4 स्थानांची झेप घेतली असून, ती आता 19व्या स्थानी पोहोचली आहे. गोलंदाजी क्रमवारीत इंग्लंडची सोफी एक्लेस्टोन अजूनही अव्वल स्थानी कायम आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या नॉनकुलुलेको म्लाबा (सहा स्थानांचा फायदा, 23व्या स्थानी) आणि क्लो ट्रायॉन (सहा स्थानांचा फायदा, 45व्या स्थानी) यांनीही वेस्ट इंडिजविरुद्धच्या चांगल्या कामगिरीनंतर गोलंदाजांच्या क्रमवारीत प्रगती केली आहे. म्लाबाने त्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात चार बळी घेत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत 11 स्थानांची झेप घेत 35वे स्थान गाठले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात या महिन्याच्या अखेरीस 5 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतही स्मृती मानधनाकडून अशाच चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.