

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कसोटी क्रमवारीची नवीन यादी जाहीर केली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) तिसऱ्या पर्वाच्या समाप्तीनंतर ही क्रमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या वेळेस अव्वल फलंदाजांच्या क्रमवारीत फारसे बदल झाले नसले तरी, खालील स्थानांवर अनेक मोठे बदल दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, ऋषभ पंत अद्याप मैदानात उतरला नसतानाही त्याला या क्रमवारीचा फायदा झाला आहे.
आयसीसीने जारी केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीनुसार, इंग्लंडचा जो रूट 888 गुणांसह पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने बऱ्याच काळापासून हे स्थान टिकवून ठेवले आहे. त्याच्यापाठोपाठ इंग्लंडचाच हॅरी ब्रूक 873 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा केन विल्यमसन 867 गुणांसह तिसऱ्या स्थानी, तर भारताचा यशस्वी जैस्वाल 847 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 824 गुणांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे.
द. आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा, ज्याने आपल्या नेतृत्वात संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवून दिले, तो सध्या 806 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा कामिंदू मेंडिस आयसीसी कसोटी क्रमवारीत 761 गुणांसह सातव्या स्थानी आहे. सातव्या क्रमांकापर्यंत कोणताही बदल झालेला नाही, परंतु त्यानंतर क्रमवारीत काहीशी हालचाल दिसून येते. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला या वेळी एका स्थानाचा फायदा झाला असून, तो आता आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा सौद शकील देखील त्याच्यासोबत संयुक्तपणे आठव्या क्रमांकावर आहे. दोघांचेही सध्या 739 गुण आहेत.
न्यूझीलंडचा डॅरिल मिचेलने दोन स्थानांची झेप घेत थेट दहावे स्थान गाठले आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने, ज्याने संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवून दिले, तब्बल 7 स्थानांची मोठी झेप घेत 11वे स्थान पटकावले आहे. त्याचे 723 गुण आहेत, मात्र तो अव्वल 10 मध्ये स्थान मिळवण्यापासून थोडक्यात हुकला. दुसरीकडे, डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडची अव्वल 10 मधून घसरण झाली आहे. तो आता चार स्थानांच्या नुकसानासह 12व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे गुण देखील 716 पर्यंत खाली आले आहेत.
एकंदरीत, ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत काही अनपेक्षित बदल दिसून आले असून, आगामी मालिकांमुळे या क्रमवारीत आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे.