
पंतची आक्रमक आणि प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणण्याची शैली इंग्लंडच्या वातावरणात नेहमीच यशस्वी ठरली आहे. मागच्या वेळी भारताने इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळला, तेव्हा त्याने झंझावाती शतक झळकावले होते. यंदाही तोच या दौर्यात भारताच्या बाजूने सामन्याचे पारडे फिरवणारा ‘एक्स-फॅक्टर’ ठरू शकतो, अशी चाहत्यांची धारणा आहे. विशेषतः, चेंडू स्विंग होत असताना इंग्लिश गोलंदाजांवर दबाव टाकण्याची त्याची क्षमता परदेशातील त्याच्या कामगिरीचे वैशिष्ट्य राहिले आहे.
इंग्लंडमधील पंतची आकडेवारी त्याचे महत्त्व अधोरेखित करते. त्याने 12 कसोटी सामन्यांमध्ये 29.18 च्या सरासरीने 642 धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. जुलै 2022 मध्ये एजबॅस्टन येथे त्याने केलेले अविस्मरणीय शतक हे दबावाखाली आणि दर्जेदार गोलंदाजीसमोर उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या त्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे.
वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत, पंतचा अनुभव आणि संयम युवा फलंदाजीच्या फळीला मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. रवींद्र जडेजा आणि के. एल. राहुल यांच्यासह पंत भारतीय मधल्या फळीचा कणा असून, त्याच्याकडून संघाला स्थैर्य आणि आक्रमकता मिळण्याची अपेक्षा आहे.
या मालिकेपूर्वी इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यांमध्ये 116 आणि 51 धावांची खेळी करून पंतने आशादायक कामगिरी केली आहे. यावरून तो पुन्हा बहरात परतत असल्याचे आणि त्याचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येते. इंग्लंडमधील सीम-अनुकूल खेळपट्ट्यांवर त्याच्या तांत्रिक कौशल्याची आणि संयमाची कसोटी लागणार असली, तरी त्याचा अनुभव पाहता तो या आव्हानासाठी सज्ज असल्याचे दिसते.
20 जून रोजी लीडस् येथे सुरू होणार्या पहिल्या कसोटी सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऋषभ पंत केवळ धावाच नव्हे, तर तो मैदानात जी ऊर्जा आणतो आणि सहकारी खेळाडूंनाही प्रेरणा देतो, त्यासाठीही तो महत्त्वाचा आहे. जर पंतला त्याचा नेहमीचा सूर सापडला, तर इंग्लंडमध्ये ऐतिहासिक मालिका विजयाच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये तो निर्णायक घटक ठरू शकतो, यात शंका नाही.
सामने 43
धावा : 2,948
सरासरी : 42.11
स्ट्राईक रेट : 73.62
शतके : 6
अर्धशतके : 15
2016 हंगाम : 10 सामने : 198 धावा : 24.75 सरासरी
2017 हंगाम : 14 सामने : 366 धावा : 26.14 सरासरी
2018 हंगाम : 14 सामने : 684 धावा : 52.61 सरासरी
2019 हंगाम : 16 सामने : 488 धावा : 37.53 सरासरी
2020 हंगाम : 14 सामने : 343 धावा : 31.18 सरासरी
2021 हंगाम : 16 सामने : 419 धावा : 34.51 सरासरी
2022 हंगाम : 14 सामने : 340 धावा : 30.91 सरासरी
2024 हंगाम : 13 सामने : 446 धावा : 40.55 सरासरी
2025 हंगाम : 14 सामने : 269 धावा : 24.45 सरासरी