

icc womens world cup 2025 smriti mandhana reaction team India victory
भारतीय महिला क्रिकेट संघाने २००५ आणि २०१७ च्या एकदिवसीय विश्वचषकात, तसेच २०२० च्या टी२० विश्वचषकात अंतिम फेरी गाठली, पण विजयाच्या किनाऱ्याजवळ येऊनही त्यांना अपयशाचे कडवट घोट प्यावे लागले. एवढ्यावरच न थांबता, २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुवर्णपदकाने ऐनवेळी हुलकावणी दिली. अशा न भूतो न भविष्यति निराशांच्या मालिकेवर मात करत संघाला विश्वविजेतेपदापर्यंत घेऊन जाणाऱ्या स्मृती मानधनाने, अपयशाच्या लाटांचा सामना नेमका कसा केला, याची कहाणी सांगितली आहे.
भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने २०२५ चा महिला विश्वचषक जिंकल्यानंतर, मागील काही वर्षांपासून सतत मिळत असलेल्या निराशेवर आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ‘मागील अनेक वर्षांपासून आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाच्या पदरी सातत्याने निराशा पडत होती. स्वप्नभंगाचा हा सिलसिला सुरू होता. अशा परिस्थितीत आम्हाला यंदाच्या विश्वचषकात गमावण्यासारखे काही उरलेच नव्हते. नेमक्या याच कारणामुळे, निर्भीडपणे व मनमोकळेपणाने खेळण्याची मोकळीक संघाला मिळाली, ज्यातून हा विश्वविजय साकारला.’
स्मृती मानधनाचा थेट रोख २०१७ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून सुरू झालेल्या दुर्दैवी पर्वाकडे होता. २०२० च्या टी२० विश्वचषकासह, त्यानंतर २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण स्पर्धाही तिच्या डोळ्यासमोर होत्या. २०२५ चा विश्वचषक जिंकण्यापूर्वीच्या या पाच महत्त्वाच्या स्पर्धांचा लेखाजोखा पाहिला, तर टीम इंडियाला दोन वेळा अंतिम विजयापासून वंचित राहावे लागले होते; तर उरलेल्या तीन स्पर्धांमध्ये त्यांना खिताबी लढतीपूर्वीच गाशा गुंडाळावा लागला होता. मानधनाने आपल्या संघर्षाचा हा पट उघड केला.
मिताली राज, झुलन गोस्वामी यांसारख्या दिग्गज खेळाडूंना आयसीसी ट्रॉफी जिंकल्याशिवाय निवृत्त व्हावे लागले. हरमनप्रीत कौर देखील तिच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याबद्दल बोलताना स्मृती म्हणाली, ‘‘याची सुरुवात झुलू दी (झुलन गोस्वामी), अंजुम दी (अंजुम चोप्रा), मिताली दी (मिताली राज) यांच्यापासून झाली. २००५ च्या अंतिम फेरीत आम्ही हरलो. २०१७ चा पराभव आमच्यासाठी मोठा ‘हार्टब्रेक’ ठरला होता. आम्हाला काय झाले, हेच समजले नाही. २०२० च्या टी२० विश्वचषकात पुन्हा एकदा मन तुटले. मी आणि हरमन नेहमी बोलत असू की, या हार्टब्रेकचा अतिरेक झालाय. आता माझ्या मनात अशा गोष्टींना स्वीकारण्याची जागाच उरलेली नाही.’’
संघातील वातावरणाबद्दल बोलताना, स्मृती मानधनाने आपले मन मोकळे केले. ती म्हणाली, प्रत्येक विश्वचषकात संघाच्या वाट्याला केवळ निराशाच येत होती. त्यामुळे खेळाडूंना नेहमीच एक अतिप्रचंड जबाबदारीचे ओझे जाणवायचे.
भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मानधनाने सांगितले, ‘मागील टी२० विश्वचषक आमच्यासाठी अत्यंत कसोटी पाहणारा होता. त्या पराभवानंतर आम्ही स्वतःला सावरले आणि पूर्णपणे फिटनेसवर लक्ष केंद्रित केले. आम्ही प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीवर मेहनत घेतली.’
ती पुढे म्हणाली, ‘या विश्वचषकात ज्या प्रकारे सगळ्यांनी एकजुटीने काम केले, प्रत्येक खेळाडू एकमेकांना मदत करण्यासाठी तत्पर होता. संघातील हे वातावरण नेमके कसे होते, हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. पण ते पूर्णपणे जादुई होते. या सकारात्मक ऊर्जेनेच संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवले,’ असे तिने ठामपणे सांगितले.