

T20 World Cup 2026 boycott Controversy ICC action against Pakistan
दुबई : टी-२० विश्वचषकातील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या पाकिस्तान सरकारच्या निर्णयानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. 'एनडीटीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील ४८ तासांत आयसीसीची एक उच्चस्तरीय आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली असून, यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) कठोर निर्बंध लादण्याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
पाकिस्तान सरकारने आपल्या संघाला १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळण्यास मनाई केली आहे. सलमान अली आघाच्या नेतृत्वाखालील हा संघ विश्वचषकातील इतर सर्व सामन्यांमध्ये मात्र खेळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. आपल्याला हवे तेच सामने खेळण्याच्या पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे आयसीसी (ICC) प्रचंड संतापली आहे. या निर्णयामुळे भविष्यात जागतिक क्रिकेटमध्ये मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसी केवळ आर्थिक दंड लावून थांबणार नाही, तर पाकिस्तानला जागतिक क्रिकेटपासून एकाकी पाडण्याची तयारी सुरू आहे.
आर्थिक फटका : आयसीसीकडून मिळणाऱ्या वार्षिक महसुलात मोठी कपात.
पीएसएलला (PSL) फटका : परदेशी खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यासाठी लागणारे 'ना हरकत प्रमाणपत्र' (NOC) रोखले जाण्याची शक्यता.
निलंबन : अत्यंत टोकाच्या परिस्थितीत, पाकिस्तानला संपूर्ण टी-२० विश्वचषकातूनच निलंबित करण्याचा पर्यायही आयसीसीसमोर खुला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव बांगला देशने भारतात खेळण्यास नकार दिल्यानंतर त्यांना स्पर्धेतून डच्चू देण्यात आला होता. तेव्हापासून आयसीसी आणि पीसीबी यांच्यातील तणाव वाढत आहे. पाकिस्तान सरकारने रविवारी (दि. २) सोशल मीडियाद्वारे आपला अंतिम निर्णय जाहीर करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
ऑस्ट्रेलियाला मायदेशात ३-० ने धूळ चारल्यानंतर पाकिस्तानचा संघ फॉर्मात आहे. त्यांचा संघ मंगळवारी (दि. ३) श्रीलंकेला रवाना होईल. विश्वचषकात त्यांचा पहिला सामना ७ फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध, १० फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध आणि १८ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर पार पडेल.