

ICC anti-corruption T20 WC 2026: क्रिकेट कॅनडाबाबत भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटने याबाबत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच भारत आणि श्रीलंका येथे झालेल्या टी २० वर्ल्डकप सामन्यात कॅनडाच्या सामन्यावेळी भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला जात आहे.
इएसपीएस क्रिकइन्फोने दिलेल्या बातमीनुसार आयसीसीचे अँटी करप्शन युनिट दोन प्रकरणी तपास करत आहे. यातील एक प्रकरण हे क्रिकेट कॅनडामधील लागेबांधे आणि आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक स्तरावरील सामन्यावेळी आयसीसीचे अँटी करप्शन कोडचे उल्लंघन केल्याचे दुसरे प्रकरण आहे.
या बाबतचे आरोप पहिल्यांदा करप्शन क्राईम अँड क्रिकेट या डॉक्युमेंटरीमध्ये करण्यात आले. ही डॉक्युमेंटरी कॅनेडियन इन्व्हेस्टिगेटिव्ह प्रोग्राम फिफ्त इस्टेट यांनी प्रोड्युस केली आहे. ४३ मिनिटांच्या या फिल्ममध्ये क्रिकेट कॅनडामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारावरून खूप सारे आरोप करण्यात आले आहेत. या डॉक्युमेंटरीचे प्रक्षेपण सीबीसीवरून करण्यात आले होते.
डॉक्युमेंटरीमध्ये टी २० वर्ल्डकपमधील कॅनडा विरूद्ध न्यूझीलंड सामन्यावेळी भ्रष्टाचार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. न्यूझीलंड ज्यावेळी धावांचा पाठलाग करत होते त्यावेळी पाचव्या षटकात कॅप्टन दिलप्रीत बाजवाने गोलंदाजी केली. बाजवाला स्पर्धेच्या तीन आठवड्यापूर्वी संघाचा कर्णधार केलं गेलं होतं.
२२ वर्षाचा बाजवा हा प्रामुख्याने फलंदाजी करतो तसेच ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करतो. न्यूझीलंडची अवस्था २ बाद ३५ धावा अशी असताना बाजवाने गोलंदाजी करण्यास सुरूवात केली. कॅनडाने वेगवान गोलंदाज जसकरन सिंग आणि डिलोन हेलिंजर यांना पहिल्यांदा गोलंदाजी दिली होती. या दोघांनी अनुक्रमे १५ आणि १४ धावा दिल्या.
त्यानंतर फिरकीपटू साद बीन जफरला तिसरं षटक टाकण्यास देण्यात आलं. त्याने मेडन ओव्हर टाकत एक विकेट घेतली. दुसरी विकेट पुढच्या षटकात हेलिगरने घेतली. त्यानंतर चौथे षटक हे बाजवाने टाकले. त्याने षटकाची सुरूवातच नो बॉलने केली त्यानंतर वाईड बॉल टाकला. त्याने या षटकात १५ धावा दिल्या.
दुसऱ्या एका तपासात कॅनडाचे कोच खुर्रम चोहान यांचे एक फोन कॉल रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं आहे. त्यात ते क्रिकेट कॅनडाचे वरिष्ठ अधिकारी (आता माजी) त्यांच्यावर ठराविक खेळाडूंना देशाच्या संघात निवडावे यासाठी दबाव टाकत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा ऑडिओ गेल्या वर्षी लीक झाला होता. त्याचा अँटी करप्शन युनिट चौकशी करत आहे. या ऑडिओमध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाल्याचा देखील दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबत आयसीसीचे इंटिग्रिटी युनिटचे अंतरिम जनरल मॅनेजर अँड्र्यू यांनी इएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या वक्तव्यात सांगितलं की आयसीसीचे अँटी करप्शन युनिटला सीबीसीने प्रक्षेपित केलेल्या डॉक्युमेंटरीबाबत माहिती आहे. याबाबत तपास सुरू आहे. त्यामुळं या आरोपांमधील तथ्यांबाबत आताच वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही. '