

Harshit Rana
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाल्यापासून वेगवान गोलंदाज हर्षित राणाला ट्रोलिंग आणि द्वेषपूर्ण टिप्पण्या मिळत आहेत. त्याच्या निवडीवर चाहते आणि तज्ज्ञांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दिल्लीचा हा २३ वर्षीय वेगवान गोलंदाज 'फेवरेटिज्म'मुळे निवडल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने हर्षित राणावर होत असलेल्या ट्रोलिंगवर टीका केली आहे.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्राने चाहत्यांना आवाहन केले की, त्यांनी आपला राग चुकीच्या खेळाडूवर काढू नये. राणाला वारंवार संघात संधी मिळत आहे, म्हणून त्याला दोष देणे चुकीचे आहे. चोप्रा म्हणाले, "लोक त्या मुलाला खूप ट्रोल करत आहेत. त्याचे नाव संघात येणे ही त्याची चूक नाही. जो कोणी भारतासाठी खेळतो, त्याची निवड निवडकर्ते करतात. कर्णधार आणि प्रशिक्षकांचे मतही यात महत्त्वाचे असते. यानंतरही जर एखाद्या खेळाडूचे नाव प्रत्येक वेळी संघात येत असेल, तर ती त्याची चूक नाही. तुम्ही चुकीच्या दिशेने निशाणा साधत आहात."
चोप्राने स्पष्ट केले की, राणाची निवड म्हणजे संघ व्यवस्थापनाचा त्याच्या प्रतिभेवर असलेला विश्वास आहे, त्या खेळाडूकडून काही गैरकृत्य झाले आहे असे नाही. "मला वाटते की त्याच्यामध्ये क्षमता आहे. तो फलंदाजी करू शकतो, आणि त्याने जिथे जिथे गोलंदाजी केली आहे, तिथे चांगली कामगिरी केली आहे. ज्या कोणाची भारतासाठी निवड झाली आहे, त्याला ट्रोल करणे थांबवा. त्याच्यामध्ये क्षमता आणि चांगला परफॉर्मन्स देण्याची ताकद आहे," असे म्हणत चोप्राने चाहत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले.
राणाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून अजून एक वर्षही झालेले नाही, पण त्याने दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळले आहेत. तसेच तो आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता.
माजी निवड समितीचे अध्यक्ष, के. श्रीकांत यांनी निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले असताना, चोप्राने मात्र राणाच्या बाजूने अधिक सहानुभूतीपूर्ण भूमिका घेतली आहे. "भारतीय संघात हर्षित राणाला सातत्याने का संधी दिली जाते आहे, हे कोडे माझ्यासाठी अद्याप उलगडलेले नाही. कोणतीही खास कामगिरी केलेली नसतानादेखील त्याचे संघातील स्थान 'जैसे थे' राहते, हे आश्चर्यकारक असल्याचे श्रीकांत यांनी म्हटले आहे.