Suryakumar Yadav on MS Dhoni
हैदराबाद : भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने हैदराबादमधील एका कार्यक्रमात सांगितले की, भारतीय संघात एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी न मिळाल्याची खंत त्याला कायम राहील. ३५ वर्षीय सूर्यकुमारने २०२१ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने देशांतर्गत क्रिकेटपासून राष्ट्रीय टी-२० संघाच्या नेतृत्वापर्यंतचा प्रवास सांगताना, त्याने विविध भारतीय कर्णधारांसोबत खेळण्याचा अनुभवही सांगितला.
नुकताच दुबई येथे आशिया चषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमारने, धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी हुकल्याबद्दल आपली निराशा व्यक्त केली. "धोनी भारताचा कर्णधार असताना त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याची माझी खूप इच्छा होती. पण मला ती संधी मिळाली नाही. IPLमध्ये मात्र त्याच्याविरुद्ध खेळताना मी त्याला अनेकदा विकेटकीपिंग करताना पाहिलं. तो खूपच शांत स्वभावाचा आहे. त्याच्याविरुद्ध खेळताना मला एक गोष्ट शिकायला मिळाली, दबावाच्या क्षणी शांत राहणं. तो खेळाकडे पाहतो, आजूबाजूला काय चालले आहे ते पाहतो आणि मग निर्णय घेतो."
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्याचा सूर्यकुमारचा प्रवास मोठा होता. त्याने २०१० मध्ये मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली, परंतु त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी एका दशकाहून अधिक काळ वाट पाहावी लागली. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण २०२१ मध्ये अहमदाबाद येथे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात झाले, परंतु त्या पहिल्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.
कोहलीबद्दल सूर्यकुमार म्हणाला, "मी विराटच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले. विराट खूप कडक शिस्त पाळणारा आहे. तो तुमच्या मर्यादांना पुढे ढकलतो आणि सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा करतात. सर्वच कर्णधारांना खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी हवी असते, पण तो थोडा वेगळा होता."
मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना सूर्यकुमारचा करिअर अधिक बहरले. बार्बाडोसमधील टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने शानदार कॅच घेतला आणि संघाला विजेतेपद मिळवून दिलं.
रोहितच्या कर्णधारपदाचे वर्णन करताना सूर्यकुमार म्हणाला, "रोहितच्या नेतृत्वाखाली मी आयपीएल आणि भारतासाठी खूप क्रिकेट खेळलो. तो प्रत्येक खेळाडूला कम्फर्ट देतो आणि तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्याचे दार २४ तास सर्वांसाठी खुले असायचं. ही एक वेगळीच गुणवैशिष्ट्यं मी त्याच्याकडून आणि इतर कर्णधारांकडून शिकलो."
सूर्यकुमारच्या कामगिरीमुळे आणि सातत्यामुळे अखेरीस त्याला रोहित शर्माकडून भारताच्या टी२० संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी मिळाली. देशांतर्गत क्रिकेटपटूपासून राष्ट्रीय टी२० संघाचे नेतृत्व करण्यापर्यंतचा त्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याच्या नेतृत्वाखाली, भारताने नुकताच दुबई येथे आशिया चषक जिंकला. त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीतील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. पदार्पणापासून त्याची अनोखी फलंदाजीची शैली आणि वैशिष्ट्यपूर्ण फटकेबाजी त्याची ओळख बनली आहे.