

Rohit Sharma
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये नुकताच एक मोठा बदल करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एकदिवसीय (वनडे) संघाच नेतृत्व रोहित शर्माकडून युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवलं आहे. मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी हा निर्णय जाहीर केला, ज्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने उत्कृष्ट कामगिरी केली होती, परंतु बीसीसीआयला आता पुढील पिढीला संधी देण्याची गरज वाटत आहे. याच पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावर रोहित शर्माची तेरा वर्षांपूर्वीची एक जुनी पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामुळे क्रिकेट जगतात एक नवी चर्चा सुरू झाली आहे.
२०१२ मध्ये रोहित शर्माने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने लिहिले होते, "एका युगाचा अंत (४५) आणि नव्या युगाची सुरुवात (७७)…" ही जुनी पोस्ट आता समोर येताच, क्रिकेट चाहते चकित झाले आहेत. अनेकांनी या संदेशाला सध्याच्या घडामोडींशी जोडत असा प्रश्न उपस्थित केला आहे की, रोहितने १३ वर्षांपूर्वीच शुभमन गिल भारताचा कर्णधार होणार असल्याची भविष्यवाणी केली होती का? कारण रोहित शर्माची जर्सी क्रमांक ४५ आहे, तर भारताचा नवा कर्णधार शुभमन गिल ७७ क्रमांकाची जर्सी परिधान करतो. हा क्रमांक आणि कर्णधारपदाचा बदल हा केवळ योगायोग आहे की एखादा संकेत, यावर चर्चा रंगली आहे.
या व्हायरल पोस्टमागील खरी गोष्ट मात्र वेगळी होती. २०१२ मध्ये रोहित शर्मा आपला जर्सी क्रमांक बदलण्याचा विचार करत होता. त्याला आपला जुना नंबर ४५ सोडून ७७ हा नवीन क्रमांक घ्यायचा होता आणि त्याने ती पोस्ट याच बदलाचा संकेत म्हणून केली होती. मात्र, आता जेव्हा ७७ क्रमांकाची जर्सी घालणाऱ्या शुभमन गिलने रोहितची जागा घेत भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारल्याने जुनं वाक्य आज खऱ्या भविष्यावाणीसारखे वाटत आहे.
शुभमन गिल आता भारताच्या कसोटी आणि वनडे अशा दोन्ही संघांची कमान सांभाळत आहे. रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गिलने कसोटी कर्णधार म्हणून सूत्रे हाती घेतली. त्याने नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यावरील 'एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफी'मध्ये पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व केले. ही मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.