

Hardik Pandya SMAT:
हार्दिक पांड्या हा भारताचा एक स्टार क्रिकेट आहे. जो तसा आपल्या स्टाईलिंग, गेम आणि ग्लॅमरसाठी प्रसिद्ध आहे तसाच तो त्याच्या बेधडक निर्णयांसाठी देखील प्रसिद्ध आहेत. मात्र हार्दिक पांड्या सध्या दुखापतीतून सावरत असल्यानं टीम इंडियापासून दूर आहे.
जवळपास ४२ दिवसांनंतर आपला फिटनेस सिद्ध करण्यासाठी हार्दिक पांड्या मैदानावर परतला आहे. पांड्या सध्या सईद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळतोय. तो हैदराबादमध्ये बडोदा विरूद्ध पंजाब यांच्यातील सामना खेळण्यासाठी आला होता. त्यावेळी चाहत्यांनी मैदानात घुसून पांड्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला होता. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला.
मात्र या घटनेमुळं हैदराबाद क्रिकेट असोसिएशनची चिंता वाढील. हैदराबाद पोलिसांकडून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जाऊ लागली. त्यानंतर आज (४ डिसेंबर) ला बडोदा विरूद्ध गुजरातच्या होणाऱ्या सामन्याचे ठिकाण फक्त काही तास आधी बदलण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार बडोदा आणि गुजरात यांच्यातील ४ डिसेंबरचा सामना हा उप्पल येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये शिफ्ट करण्यात आला आहे. आधी हा सामना हैदराबादच्या जिमखाना स्टेडियमवर खेळवण्यात येणार होता. हैदराबाद पोलिसांनी या सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षा देखील पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
जिमखाना स्टेडियमवरच बडोदा आणि पंजाब यांच्यातील सामना झाला होता. त्यावेळी प्रेक्षक मैदनात घुसले होते. या मैदानावर प्रेक्षक गॅलरी आणि मैदान यांच्यामध्ये फारसं सुरक्षा कवच नाही. त्यामुळे प्रेक्षक सामन्यावेळी सहज मैदानात घुसू शकतात. यामुळं सामना अनेकवेळा थांबवण्याची वेळ येते.
गेल्या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक चाहता गॅलरीतून धावत येऊन हार्दिक पांड्याजवळ पोहचला होता. पांड्या आपलं षटक संपवून क्षेत्ररक्षण करत होता.
हा चाहता धावत येऊन पांड्याच्या पाया पडतो यानंतर सुरक्षा रक्षक धावत येऊन या चाहत्याला पकडतात. मात्र चाहता सेल्फी घेण्याची मागणी करतो. त्यानंतर पोलीस त्याला पडकडून मैदानावरून बाहेर घसटत घेऊन जाऊ लागतात. मात्र हार्दिक पांड्या त्या सुरक्षा रक्षकाला थांबवतो आणि चाहत्याला सेल्फी घेऊ देतो.
पंजाबविरूद्धचा सामना हार्दिक पांड्यासाठी फारसा चांगला नव्हता. गोलंदाजीत हार्दिक पांड्याने ४ षटकात ५२ धावांची लयलूट केली. त्याला फक्त १ विकेट घेता आली. मात्र फलंदाजीत हार्दिक पांड्यानं दमदार कामगिरी केली. त्यानं ४२ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं नाबाद ७७ धावा ठोकल्या. या खेळीच्या जोरावर हार्दिकच्या संघानं हा सामना ७ विकेट्सनं जिंकला.