

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या आगामी टी-20 मालिकेसाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याला ग्रीन सिग्नल देण्यात आला असून, याचवेळी टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलच्या सहभागाबाबत मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे.
शुभमन गिलची फिटनेस चाचणी बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये प्रोटोकॉलनुसार पार पडली असून, या चाचणीचे निष्कर्ष समोर आल्यानंतर त्या माध्यमातून त्याच्या पुनरागमनाची दिशा स्पष्ट होईल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना गिलला मानेची दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर त्याला दुसऱ्या कसोटीत तसेच सध्या सुरू असलेल्या वन-डे मालिकेत खेळता आलेले नाही.
भारतीय टी-20 संघात फारसे बदल अपेक्षित नसले, तरी दुखापतीची समस्या वगळता, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे गिलच्या फिटनेस अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. ‘एनसीए’च्या मेडिकल सायन्स विभागाकडून हा अहवाल दिला जाणार आहे.
गिलला इंजेक्शन देण्यात आले असून, 21 दिवसांची विश्रांती व रिहॅबचा सल्ला दिला गेला. यात दुखापतग्रस्त भागाच्या स्नायूंना बळकटी देणारे विशिष्ट व्यायाम समाविष्ट होते. अर्थातच, प्रशिक्षणाला सुरुवात करण्यापूर्वी मेडिकल सायन्स विभाग त्याची सर्व अनिवार्य फिटनेस चाचणी घेईल, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
हा विभाग त्याच्या हालचालींचे आणि फलंदाजी करताना त्याला कोणताही त्रास होत नाही, याचे मूल्यांकन केल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही, असेही सूत्राने स्पष्ट केले.
दरम्यान, अष्टपैलू हार्दिक पंड्याला टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी फिटनेस क्लिअरन्स मिळाले आहे. जवळपास अडीच महिन्यांनंतर तो मंगळवारी हैदराबाद येथे पंजाबविरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत आपला पहिला सामना खेळणार आहे. संघ जाहीर होण्यापूर्वी त्याची एकूण फिटनेस तपासण्यासाठी राष्ट्रीय निवडकर्ते प्रग्यान ओझा यांच्या उपस्थितीत तो 4 डिसेंबर रोजी बडोदा आणि गुजरात यांच्यातील सामन्यातही खेळण्याची शक्यता आहे.
21 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात हार्दिकने ‘एनसीए’च्या बाहेर पाऊलही टाकले नाही. या कालावधीत त्याने रिहॅब प्रोटोकॉल पूर्ण केला असून, त्याला आता टी-20 सामन्यांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. 4 डिसेंबरला गुजरातविरुद्ध आणि जर भारतीय संघ व्यवस्थापनाने लवकर बोलावले नाही, तर तो 6 डिसेंबरला हरियाणाविरुद्धचा सामनाही खेळण्याचा विचार करत आहे, अशी माहिती एनसीएमधील घडामोडींशी संबंधित एका सूत्राने दिली.