

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीचे कौतुक केले आहे. पण आगामी ॲशेस मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर त्यांच्या या आक्रमक शैलीचा खरा कस लागेल, असा सूचक इशाराही त्याने दिला आहे. इंग्लंड फलंदाज सपाट खेळपट्ट्यांवर सर्वोत्तम खेळ करतात, मात्र ऑस्ट्रेलियात त्यांना अशा खेळपट्ट्या मिळण्याची शक्यता कमी असल्याचे मत पाँटिंगने व्यक्त केले.
'द टाइम्स' या वृत्तपत्राशी बोलताना पाँटिंग म्हणाला, ‘इंग्लंडला अशाच प्रकारे खेळण्याची गरज आहे. या शैलीमुळे इंग्लंडसाठी सर्व काही सोपे होते आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाही यानुसार वेगाने जुळवून घ्यावे लागते. परिणामी गोलंदाजांवरही तत्काळ दडपण येते.’
या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या प्रतिष्ठित ॲशेस मालिकेसाठी दोन्ही संघ तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पाँटिंगने इंग्लंडच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनावर आणि ऑस्ट्रेलियन परिस्थितीत त्याच्या संभाव्य परिणामांवर मत मांडले. त्याच्या मतानुसार, इंग्लंड संघाला फलंदाजीसाठी सपाट खेळपट्ट्यांची गरज असते, याउलट ऑस्ट्रेलियात मात्र ते गोलंदाजीला पोषक ठरणाऱ्या खेळपट्ट्यांची अपेक्षा ठेवतील.
इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीचे कौतुक करताना पाँटिंगने नमूद केले की, गेल्या काही वर्षांमध्ये ही शैली अधिक प्रगल्भ आणि प्रभावी झाली आहे.
‘एक कट्टर ऑस्ट्रेलियन असूनही, मला इंग्लंडची सध्याची खेळण्याची शैली पाहण्यात खूप आनंद मिळतो. ही शैली म्हणजे इंग्लंडने काही वर्षांपूर्वी सुरू केलेल्या खेळाचेच अधिक प्रगल्भ आणि सुधारित स्वरूप आहे. ऑस्ट्रेलियन संघाने मागील दौऱ्यात याचा अनुभव घेतला असून, त्यातून ते बरेच काही शिकले आहेत.’ असेही पाँटिंगने सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘माझ्या मते, इंग्लिश फलंदाज ऑस्ट्रेलियातही आक्रमकपणे फटकेबाजी करू शकतात आणि तसा प्रयत्न ते नक्कीच करतील. ही त्यांची नैसर्गिक खेळण्याची पद्धत आहे. संघाचे प्रशिक्षक व कर्णधार यांनाही आपल्या फलंदाजांनी तसेच खेळावे, असे वाटते.’
खेळपट्ट्या कशा तयार केल्या जातात, याबद्दल बोलताना पाँटिंगने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्याच्या मते, ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापन खेळपट्टी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (ग्राउंड्समन) कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या सूचना देत नाही.
‘ऑस्ट्रेलियात खेळपट्ट्या कशा तयार केल्या जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी किंवा माझ्या प्रशिक्षकांनी कधीही ग्राउंड्समनशी चर्चा केली नाही. त्यांनी शक्य तितकी सर्वोत्तम खेळपट्टी तयार करावी, अशीच आमची अपेक्षा होती. मात्र, इंग्लंडला नेमकी कशी खेळपट्टी हवी आहे, याबद्दल मला खरोखरच कल्पना नाही,’ असे म्हणत पाँटिंगने चर्चेला एक नवे वळण दिले आहे.