

तूर्तास मात्र सॅमसनचे ‘रॉयल्स’सोबतचे भवितव्यही धोक्यात
संजू सॅमसनने स्वतःहून ट्रेडची मागणी केल्याने फ्रँचायझीसमोर मोठा पेच
चेन्नई सुपर किंग्जसह अनेक संघ उत्सुक
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याचे ‘आयपीएल’मधील भवितव्य सध्या अधांतरी आहे. एकेकाळी गौतम गंभीरसारख्या मार्गदर्शकाने मी तुला संघातून तेव्हाच काढेन, जेव्हा तू 21 वेळा शून्यावर बाद होशील, असे सांगून एक प्रकारे त्याच्यावरील विश्वास अधोरेखित केला होता. मात्र, आता त्याच सॅमसनने आपल्याच संघाला सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त असून, त्यामुळे ‘आयपीएल’ वर्तुळात खळबळ उडाली आहे.
संजू सॅमसनने नुकतेच आर. अश्विनसोबतच्या एका मुलाखतीत त्याच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाचे क्षण शेअर केले. श्रीलंकेच्या दौर्यावर सलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर गौतम गंभीरने त्याला बोलावून धीर दिला होता. गंभीरच्या त्या आश्वासनाने आपला आत्मविश्वास कसा दुणावला, हे सॅमसनने सांगितले. याच विश्वासाच्या जोरावर सॅमसनने 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 5 सामन्यांत 3 शतके झळकावली. एकाच वर्षात अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज ठरला.
एकीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर सॅमसनची कामगिरी उंचावत असताना, दुसरीकडे राजस्थान रॉयल्ससोबतचे त्याचे संबंध बिघडल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनुसार, सॅमसन आणि फ्रँचायझी व्यवस्थापनात गंभीर मतभेद निर्माण झाले असून, त्याने स्वतःहून ट्रेड किंवा रिलीज करण्याची औपचारिक मागणी केली आहे. मात्र, ‘आयपीएल’च्या नियमांनुसार अंतिम निर्णय फ्रँचायझीच्या हातात आहे. सॅमसनसारख्या 18 कोटी रुपयांच्या खेळाडूला दुसर्या संघात ट्रेड करणे सोपे नाही. चेन्नई सुपर किंग्जसह अनेक संघ त्याच्यावर लक्ष ठेवून असले, तरी अद्याप कोणताही करार निश्चित झालेला नाही.