

CSK vs RCB Controversy: IPL 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यानंतर आता एक नवीन वाद समोर आला आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर वाजवण्यात आलेल्या ‘डोसा-इडली-सांबार’ गाण्यावर CSK व्यवस्थापनाने आक्षेप घेतला आहे.
5 एप्रिल रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये ‘डोसा-इडली, सांबर, चटणी’ हे गाणं वाजवण्यात आलं. हे गाणं सोशल मीडियावर दक्षिण भारतीय लोकांशी संबंधित स्टीरिओटाइप म्हणून वापरलं जात असल्याने CSK ला ते आक्षेपार्ह वाटलं.
CSK च्या मते, फक्त गाणंच नाही तर DJ कडून काही टिप्पणी आणि मेम्सही करण्यात आले,
जे विरोधी संघाच्या खेळाडूंना टार्गेट करणारे होते. CSK चे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी सांगितलं की, चिन्नास्वामी स्टेडियमवरील वातावरण इतर मैदानांपेक्षा वेगळं आणि काहीसं अस्वस्थ करणारं होतं.
या प्रकरणी CSK ने Board of Control for Cricket in India (BCCI) कडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून IPL गव्हर्निंग कौन्सिल यावर निर्णय घेणार आहे.
या वादाला एक जुना संदर्भही आहे. गेल्या हंगामात जितेश शर्माने या गाण्याचा उल्लेख केला होता. त्यावेळी चेपॉक स्टेडियममध्ये त्याला आउट झाल्यावर हेच गाणं वाजवण्यात आलं होतं,
ज्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली होती.
त्या घटनेनंतर CSK ने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार केली होती, DJ ने विरोधी खेळाडूंवर वैयक्तिक टिप्पणी करू नये, वातावरण सकारात्मक ठेवावं. मात्र, या सामन्यात ते नियम पाळले गेले नाहीत, असा CSK चा आरोप आहे.
CSK आणि RCB यांच्यातील स्पर्धा आधीच खूप तीव्र आहे. आता या नवीन वादामुळे मैदानाबाहेरही तणाव वाढल्याचं दिसत आहे.