

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये संघर्ष करणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संघाचा अनुभवी सलामीवीर आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे पंजाब किंग्सविरुद्धच्या आगामी महत्त्वपूर्ण सामन्याला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 'हॅमस्ट्रिंग'च्या दुखापतीमुळे रोहितला या सामन्यातून विश्रांती घ्यावी लागली असून, मुंबईसाठी हा एक मोठा हादरा मानला जात आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्धच्या मागील सामन्यात धावांचा पाठलाग करताना रोहितला ही दुखात झाली. फलंदाजी करत असताना दुसऱ्या डावातील सहाव्या षटकात रोहितला पायाच्या स्नायूंमध्ये (हॅमस्ट्रिंग) वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तो 'रिटायर्ड हर्ट' होऊन मैदान सोडून बाहेर गेला होता. ही दुखापत किती गंभीर आहे आणि तो पुढील किती सामन्यांना मुकणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, 'क्रिकबझ'ने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी (१५ एप्रिल) संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन रोहितच्या तंदुरुस्तीबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांपैकी ३ सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत खालच्या स्थानी असलेल्या मुंबईला विजयाच्या रुळावर परतण्यासाठी रोहितच्या अनुभवाची अत्यंत गरज होती. मात्र, आता तोच संघात नसल्याने सलामीच्या जोडीसह मधल्या फळीवरही दडपण येणार आहे. दुसरीकडे, प्रतिस्पर्धी पंजाब किंग्सचा संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल न लागल्याने ७ गुणांसह पंजाब मजबूत स्थितीत आहे.
रोहित शर्माने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत वैयक्तिक पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. त्याने ४ सामन्यांत ४५.६६ च्या सरासरीने आणि १६५.०६ च्या प्रभावी स्ट्राईक रेटने १३७ धावा केल्या आहेत. यात १३ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे. एकूण आयपीएल कारकिर्दीचा विचार करता, रोहितने २७६ सामन्यांत ७१८३ धावा केल्या असून त्याच्या नावावर २ शतके आणि ४४ अर्धशतके नोंदवलेली आहेत. अशा फॉर्मात असलेल्या खेळाडूची अनुपस्थिती मुंबईला महाग पडू शकते.
आयपीएल २०२६ मधील २४ वा सामना १६ एप्रिल रोजी मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना रात्री खेळवला जाईल. पंजाबची विजयाची घोडदौड रोखण्याचे मोठे आव्हान आता मुंबईच्या युवा खेळाडूंवर असेल.
१२ एप्रिल: आरसीबी विरुद्ध १८ धावांनी पराभव.
७ एप्रिल: राजस्थान रॉयल्स विरुद्ध २७ धावांनी पराभव.
४ एप्रिल: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध ६ गडी राखून पराभव.
२९ मार्च: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ६ गडी राखून विजय.