

Ruturaj Gaikwad Performance: चेन्नई सुपर किंग्सचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. सात सामने गमावल्यामुळे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. अजून एक सामना बाकी असला तरी प्लेऑफची शक्यता आहे. मात्र इतर संघांनी 15 गुणांचा टप्पा पार केला तर चेन्नईचे सर्व मार्ग बंद होतील.
सोमवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद कडून झालेल्या पराभवानंतर सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्या कामगिरीवर थेट बोट ठेवलं.
प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात ऋतुराज गायकवाडला मोठी खेळी करता आली नाही. त्याने 21 चेंडूत केवळ 15 धावा केल्या. विशेष म्हणजे, त्याच्या खेळीत एकही चौकार नव्हता. सलामीवीर म्हणून अशी कामगिरी संघासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
दुसरीकडे त्याचा जोडीदार संजू सॅमसन याने फक्त 13 चेंडूत 27 धावांची झंझावाती खेळी करत वेगळी छाप सोडली. त्यामुळे ऋतुराजच्या धीम्या फलंदाजीवर अधिक प्रश्न उपस्थित झाले.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्टीफन फ्लेमिंग यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ऋतुराजकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही.
त्यांनी म्हटलं, “ऋतुराज आणखी चांगलं करू शकतो. याआधी त्याने अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो वरच्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज आहे. पण या हंगामात त्याने आपल्या नेहमीच्या गतीने धावा केल्या नाहीत.”
फ्लेमिंग यांनी हेही मान्य केलं की खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी होती आणि 180 धावांचा टप्पा सहज पार करता येणारा नव्हता. त्यांच्या मते, हैदराबादच्या वेगवान गोलंदाजांनी टाकलेल्या स्लोअर बॉल आणि कटरमुळे सीएसकेच्या फलंदाजांना मोठा फटका बसला.
सीएसकेच्या या पराभवानंतर आता संघाचं प्लेऑफचं स्वप्न जवळपास संपल्याचं चित्र आहे, तर कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या फॉर्मबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.