

Cristiano Ronaldo Saudi Pro League exit he may leave Al Nassr
फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो याने सौदी प्रो लीगमधील अल-नासर क्लबमधील आपला अध्याय संपला असल्याचे संकेत दिले आहेत. 27 मे 2025 रोजी सौदी प्रो लीगचा हंगाम संपल्यानंतर रोनाल्डोने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे त्याच्या भविष्याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
रोनाल्डोने, ‘हा अध्याय संपला आहे. कथा? ती अजून लिहिली जात आहे. सर्वांचे आभार,’ असे पोस्टमध्ये लिहून त्यासोबत अल-नासरच्या जर्सीतील एका फोटो शेअर केला आहे. या पोस्टमुळे रोनाल्डो अल-नासर सोडून नव्या आव्हानाच्या शोधात आहे की काय, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
रोनाल्डोच्या ‘हा अध्याय संपला आहे’ या सोशल मीडिया पोस्टमुळे त्याच्या अल-नासरमधील भविष्याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचा करार 30 जून 2025 रोजी संपत आहे. त्याच्यात आणि सौदी क्लबमम्ध्ये आतापर्यंत करारवाढीचा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. काही अहवालांनुसार, अल-नासरने रोनाल्डोला क्लबमधील 5 टक्के भागीदारीसह नवीन कराराची ऑफर दिली होती, परंतु तो यावर सहमती दर्शवत नसल्याचे दिसते. याशिवाय, त्याने गेल्या वर्षी सांगितले होते की, तो अल-नासरमध्येच आपली कारकीर्द संपवू शकतो, परंतु आता त्याच्या पोस्टमुळे त्याच्या मनस्थितीत बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत.
रोनाल्डोच्या या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये तो पुढे युरोप किंवा अमेरिकेतील क्लबकडून खेळेल याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. काही चाहत्यांचा विश्वास आहे की रोनाल्डोचा हा संदेश हंगामाच्या समाप्तीकडे निर्देश करतो. तर काहींना वाटते की तो अल-नासर सोडण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सौदी प्रो लीगच्या निकालांमुळे आणि ट्रॉफी जिंकता न आल्याने रोनाल्डोच्या नाराजीच्या बातम्या यापूर्वीही समोर आल्या होत्या.
फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी नुकतेच सांगितले की, रोनाल्डो 14 जून 2025 पासून अमेरिकेत सुरू होणाऱ्या विस्तारित क्लब वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत चर्चा सुरू आहे. या स्पर्धेसाठी अल-नासरला पात्रता मिळवता आलेली नाही. इन्फँटिनो यांनी सांगितले, ‘रोनाल्डो क्लब वर्ल्ड कपमध्ये खेळू शकतो. काही क्लबशी चर्चा सुरू आहे. कोणास ठाऊक, कोणता क्लब त्याला साइन करेल.’
मेक्सिकन क्लब मॉन्टेरे यांनी रोनाल्डोला साइन करण्यासाठी जवळपास यश मिळवल्याचे अहवाल आहेत, ज्यामुळे तो क्लब वर्ल्ड कपमध्ये खेळू शकतो. याशिवाय, ब्राझीलमधील बोटाफोगो क्लबनेही रोनाल्डोला “प्रलोभनात्मक” ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रोनाल्डो हा क्लब वर्ल्ड कपमध्ये मेक्सिकन क्लब मॉन्टेरे कडून खेळू शकतो अशी चर्चा आहे. मेक्सिकन क्लबने रोनाल्डोला साइन करण्यासाठी जवळपास सर्व प्रोसेस पूर्ण केल्याची अहवालातून समोर आले आहे. याशिवाय, ब्राझीलमधील बोटाफोगो क्लबनेही रोनाल्डोला ऑफर दिल्याचे सांगितले जात आहे.
रोनाल्डोचा मूळ क्लब स्पोर्टिंग सीपी याच्याशी त्याचे भावनिक नाते आहे, आणि काही अहवालांनुसार तो तिथे परतण्याचा विचार करू शकतो. स्पोर्टिंग सीपीचा युवा विकास कार्यक्रम रोनाल्डोच्या मुलासाठी, क्रिस्टियानो रोनाल्डो ज्युनियरसाठी, देखील योग्य ठरू शकतो.
इंग्लिश प्रीमियर लीगमधील चेल्सी किंवा मँचेस्टर युनायटेड यांच्याशीही रोनाल्डोचे नावे जोडले गेले आहे. पण तो 2022 मध्ये मँचेस्टर युनायटेडमधून वादग्रस्तरित्या बाहेर पडला होता. ज्यामुळे या क्लबचे दरवाजे त्याच्यासाठी बंद असण्याची दाट शक्यता आहे.
अल-हिलाल, जो सौदी प्रो लीगमधील अल-नासरचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे, त्याने रोनाल्डोला ऑफर दिल्याच्या बातम्या आहेत. तथापि, हा बदल रोनाल्डोसाठी विवादास्पद ठरू शकतो, कारण तो अल-नासरच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. अल-अहली यासारख्या इतर सौदी क्लबनेही रोनाल्डोला साइन करण्यात रस दाखवला आहे.
रोनाल्डोचा प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सी याने इंटर मियामीसाठी एमएलएसमध्ये यश मिळवले आहे. रोनाल्डो देखील तिथे जाऊन नवीन आव्हान स्वीकारू शकतो. तथापि, यामुळे त्याची तुलना प्रतिस्पर्धी मेस्सीशी होईल, जे रोनाल्डोसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
रोनाल्डोने निवृत्ती नाकारली आहे, आणि त्याने सांगितले आहे की तो 2026 च्या फिफा विश्वचषकापर्यंत खेळू इच्छितो. त्यामुळे तो अल-नासर सोडल्यानंतरही नव्या क्लबसाठी खेळण्याची शक्यता आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डोने जानेवारी 2023 मध्ये मँचेस्टर युनायटेडमधून अल-नासरमध्ये प्रवेश केला. या करारासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू बनला. त्याच्या कराराची किंमत दरवर्षी सुमारे 1500 कोटी रुपये इतकी होती. अल-नासरसाठी त्याने 111 सामन्यांत 99 गोल आणि 19 असिस्ट्ससह जबरदस्त कामगिरी केली. त्याने सौदी प्रो लीगमध्ये दोनदा गोल्डन बूट (2024 मध्ये 24 गोल आणि 2025 मध्ये 25 गोल) जिंकले. 2023 मध्ये त्याने अल-नासरला अरब क्लब चॅम्पियन्स कप जिंकण्यास मदत केली, जिथे त्याने अंतिम सामन्यात अल-हिलालविरुद्ध दोन गोल डागले होते.
तथापि, अल-नासरसाठी सामूहिक यश मर्यादित राहिले. 2025 च्या सौदी प्रो लीगमध्ये अल-इत्तिहाद आणि अल-हिलाल या संघांनी अल-नासर मागे टाकले. ज्यामुळे रोनाल्डोचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. शिवाय, एशियन चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या कावासाकी फ्रंटाले आणि किंग कप ऑफ चॅम्पियन्सच्या उपांत्यपूर्व फेरीत अल-तावूनकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे क्लबच्या रोनाल्डोकडून अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्याची चर्चा होती. हंगामाच्या शेवटच्या सामन्यात अल-फतेहविरुद्ध 3-2 ने पराभव स्वीकारावा लागला, ज्यामध्ये रोनाल्डोने पहिला गोल (त्याचा 800 वा क्लब गोल) केला होता, तरीही निकाल निराशाजनक राहिला.