

Cristiano Ronaldo: फिफा वर्ल्डकप २०२६ च्या राऊंड ऑफ १६ मध्ये स्पेनने पोर्तुगालचा १-० ने पराभव केला. या पराभवानंतर पोर्तुगालचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले असून ख्रिस्तियानो रोनाल्डोचा देखील फिफा वर्ल्डकपमधील प्रवास थांबला आहे. हा त्याचा शेवटचा फिफा वर्ल्डकप होता. मात्र जरी रोनाल्डोचा हा शेवटचा वर्ल्डकप असला तरी त्याने अजून आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती जाहीर करण्याची गडबड केली नाही.
रोनाल्डो कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी वेळ घेणार आहे. मात्र सामन्यानंतर त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची मागोवा घेतला. ४१ वर्षाच्या रोनाल्डोचे देशाकडून वर्ल्डकप उंचावण्याचे स्वप्न स्वप्नच राहिलं असलं तरी २०१६ मध्ये २०१६ मध्ये पोर्तुगालने युरोपीय चॅम्पिनशिप जिंकली होती. हा त्याच्यासाठी वर्ल्डकप जिंकून देण्यइतकाच आनंदाचा क्षण होता.
ख्रिस्तियानो रोनाल्डो स्पेनविरूद्धच्या सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाला, 'वर्ल्डकपमधून अशा प्रकारे बाहेर पडण्याने मी दुःखी आहे. मी माझे सर्वस्व दिलं आहे. मी माझा सर्वोत्तम खेळ केला आहे. मी स्पष्ट विचारांसह बाहेर पडत आहे. हा माझा शेवटचा वर्ल्डकप होता. होय मात्र आता मी थोडा वेळ घेणार आहे. मी कुटुंबासोबत असणार आहे. मी घाई गडबडीत कोणताही निर्णय घेणार नाही. मी हीट ऑफ मोमेंटमध्ये निर्णय घेत नाही.'
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीकडे पाहताना रोनाल्डो म्हणतो, 'मी पोर्तुगालसाठी तीन टायटल जिंकले आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डोपूर्वी पोर्तुगालला एकही टायटल जिंकता आले नव्हते. २०१६ मध्ये जिंकलेली युरोपियन चॅम्पियनशिप हा आमच्या संघासाठी सर्वात मोठा कप होता. खरं सांगायचं झालं तर माझ्या दृष्टीकोणातून त्याचे महत्व वर्ल्डकप इतकेच आहे.'
पोर्तुगालच्या मॅनेजरबाबत बोलताना रोनाल्डो म्हणाला, 'मला त्यांच्यासोबत काम करणं आवडतं. ते एक ग्रेट मॅनेजर, चांगले व्यक्ती आहेत. त्यांनी पोर्तुगालसाठी जे काही केलं आहे ते कौतुकास पात्र आहे. मी त्यांचे आभार मानतो. त्यांना शुभेच्छा देतो.'