

वेस्ट इंडिज क्रिकेट एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यानच, संघातील एका विद्यमान खेळाडूवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचे अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. गयानाच्या प्रतिष्ठित 'कायटर न्यूज' या वृत्तसंकेतस्थळानुसार, सदर खेळाडूवर 11 महिलांनी बलात्काराचे आरोप केले असून, त्यापैकी एक पीडिता अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. अहवालानुसार, हा खेळाडू गयानाचा असून सध्या तो वेस्ट इंडिज क्रिकेट संघाशी संबंधित आहे. मात्र, तो खेळाडू सध्याच्या ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत सहभागी आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या अहवालातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, क्रिकेट वेस्ट इंडिज (CWI) मंडळावरच हे प्रकरण दडपल्याचा आणि संशयित आरोपी खेळाडूची ओळख गुप्त ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कॅरिबियन वाहिनी 'स्पोर्ट्स मॅक्स टीव्ही'ने मंडळाचे अध्यक्ष किशोर शैलो यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाची आपल्याला माहिती नसल्याचे सांगत, सध्या कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला.
'स्पोर्ट्स मॅक्स टीव्ही'ला दिलेल्या एका मुलाखतीत गयानाचे ज्येष्ठ वकील नायजेल ह्यूज यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 2023 मध्ये एका महिलेने त्यांच्याशी संपर्क साधून संशयित आरोपी खेळाडूविरुद्ध बलात्काराची तक्रार केली होती. वकिलांच्या मते, हा तोच खेळाडू आहे जो 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या वेस्ट इंडिज संघाचा सदस्य होता आणि गाबा कसोटीतील ऐतिहासिक विजयातही तो सहभागी होता.
आतापर्यंत कोणत्याही महिलेने या प्रकरणात रीतसर पोलीस तक्रार (एफआयआर) दाखल केलेली नाही. मात्र, प्रसिद्धी माध्यमांतील वृत्तांनुसार, गेल्या एका वर्षापासून हे प्रकरण दडपले गेले होते. संशयित आरोपी खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून गयाना येथे परतला, तेव्हा त्याचे भव्य स्वागत करण्यात आले होते, त्यामुळे हे प्रकरण सार्वजनिक चर्चेतून बाजूला पडले होते.