

मुंबई : रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीतील कर्नाटकविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मुंबई संघाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संघाचा आधारस्तंभ आणि स्टार फलंदाज सर्फराज खान याला प्रकृती खालावल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
६ फेब्रुवारीपासून मुंबई आणि कर्नाटक यांच्यात हा चुरशीचा सामना रंगणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सर्फराजला 'व्हायरल फिव्हर'ने ग्रासले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. सर्फराजच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वैद्यकीय बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. मात्र, तो या सामन्याला मुकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सर्फराज सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून गेल्याच महिन्यात त्याने हैदराबादविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले होते. चालू मोसमात त्याने ९ डावांमध्ये ५३.६२ च्या सरासरीने ४२९ धावा केल्या आहेत. अशा स्थितीत तो संघात नसणे हा मुंबईसाठी मोठा फटका ठरू शकतो.
एकीकडे सर्फराजच्या आजारपणामुळे चिंता असली, तरी दुसरीकडे मुंबईसाठी काही सकारात्मक बातम्याही आहेत. अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करणार आहे. तसेच, युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल देखील या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी संघात परतला आहे. साखळी फेरीत मुंबईने 'ग्रुप डी'मध्ये ३३ गुणांसह अव्वल स्थान पटकावत बाद फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, या मोसमात मुंबईचा संघ अद्याप अजिंक्य आहे.
मुंबईचा संघ यंदा ४३ व्या रणजी जेतेपदावर नाव कोरण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. मुंबईने गतविजेते (२०२३-२४) म्हणून आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, ८ वेळा विजेतेपद पटकावलेला कर्नाटकचा संघ मुंबईला कडवे आव्हान देण्यास सज्ज आहे. आता संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष सर्फराज खानच्या फिटनेस रिपोर्टकडे लागले आहे.
शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, सिद्धेश लाड, सर्फराज खान, आकाश आनंद, हार्दिक तमोरे, सैराज पाटील, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, ओंकार तरमाले, दिव्यांश सक्सेना, सूर्यांश शेडगे.