

BCCI revises Ajit Agarkar s contract as chairman of selection committee
मुंबई : भारतीय क्रिकेटला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवून सुवर्णकाळ दाखवणाऱ्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचे बक्षीस म्हणून, बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ जून २०२६ पर्यंत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जून २०२३ मध्ये अजित आगरकर यांनी निवड समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली. आगरकर आणि त्यांच्या समितीने घेतलेले धाडसी निर्णय आणि दूरदृष्टी यामुळे संघाला अभूतपूर्व यश मिळाले.
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या कार्यकाळात भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने अनेक वर्षांपासून हुलकावणी देणारा टी-२० विश्वचषक जिंकला. २०२४ मधील या कामगिरीसह संघाने आयसीसी स्पर्धेतील विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणला.
यानंतर भारताने २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदाला गवसणी घातली. लागोपाठ दुसऱ्या वर्षीही आयसीसीची मोठी स्पर्धा जिंकून वर्चस्व सिद्ध केले. तत्पूर्वी २०२३ मध्ये मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत दिमाखात मजल मारली होती.
आगरकरांनी अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी देऊन कसोटी संघातील स्थित्यंतराचा अवघड टप्पा यशस्वीपणे हाताळला. यामुळे संघाची कामगिरी कुठेही न खालावता भविष्यासाठी एक मजबूत संघ तयार झाला.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, २०२५ च्या इंडियन प्रीमियर लीगपूर्वीच (IPL) आगरकर यांच्या कराराचे नूतनीकरण करण्यात आले होते. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ‘‘त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने विजेतेपदे जिंकली. कसोटी आणि टी-२० संघात यशस्वी स्थित्यंतरही पाहिले. बीसीसीआयने त्यांचा करार जून २०२६ पर्यंत वाढवला असून, त्यांनी काही महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव स्वीकारला होता.’’
आगरकर यांच्या नेतृत्वाखाली, निवड समितीने विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन या तीन दिग्गजांच्या निवृत्तीचा एक आव्हानात्मक टप्पा यशस्वीपणे हाताळला. अश्विनने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे, तर रोहित आणि विराट केवळ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार आहेत. या काळात शुभमन गिल (कसोटी) आणि सूर्यकुमार यादव (टी-२०) यांच्या रूपाने संघाला नवे कर्णधारही मिळाले.
सध्याच्या निवड समितीत आगरकर यांच्यासह एस. एस. दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस. शरथ यांचा समावेश आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर वरिष्ठ निवड समितीत काही बदल अपेक्षित असल्याचे समजते.
सप्टेंबर २०२१ मध्ये ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये वरिष्ठ निवड समितीत पदोन्नती मिळालेले शरथ, आपला चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यामुळे मंडळ त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे. बीसीसीआय लवकरच या पदासाठी नवीन अर्ज मागवणार आहे.
तथापि, दास आणि बॅनर्जी यांना कायम ठेवले जाईल की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे. सध्याच्या समितीच्या कामगिरीवर मंडळ समाधानी असून, पॅनेलमध्ये केवळ एकच मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंडळ वरिष्ठ महिला आणि पुरुष ज्युनियर निवड समित्यांसाठीही नवीन अर्ज मागवणार आहे. महिला समितीच्या अध्यक्षा नीतू डेव्हिड यांच्यासह आरती वैद्य आणि मिठू मुखर्जी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. मंडळाच्या नियमांनुसार, सदस्य केवळ पाच वर्षेच आपल्या पदावर राहू शकतात. पुढील वर्षी होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकामुळे हा हंगाम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
ज्युनियर निवड समितीत सध्या थिलक नायडू, रणदेब बोस, हरविंदर सिंग सोधी, पथिक पटेल आणि किशन मोहन यांचा समावेश आहे. या ज्युनियर निवड समितीतही काही बदल करण्यास मंडळ उत्सुक असल्याचे समजते.