

मुंबई : भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आगामी देशांतर्गत हंगामापूर्वी मुंबई क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ३७ वर्षीय रहाणेने आपले वय आणि संघासाठी नवीन कर्णधार घडवण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे समजते. तथापि, एक खेळाडू म्हणून तो मुंबई संघाचा अविभाज्य भाग असेल. रहाणे याने कर्णधारपद सोडण्याची ही घोषणा सोशल मीडियावरून केली.
रहाणेच्या मते, मुंबई संघासाठी नवीन कर्णधार तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्याने संघासाठी एक खेळाडू म्हणून आपले योगदान पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
'एक्स'वर पोस्ट करत रहाणेने त्याचे म्हणणे मांडले आहे. त्याने म्हटलंय की, ‘मुंबई संघाचे कर्णधारपद भूषवणे आणि विजेतेपद पटकावणे, हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा क्षण होता. येणाऱ्या देशांतर्गत हंगामाचा विचार करता, एका नवीन कर्णधाराला तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते. त्यामुळे मी कर्णधारपदाची जबाबदारी पुढे न सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे. एक खेळाडू म्हणून माझे सर्वोत्तम योगदान देण्यासाठी मी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनसोबतचा माझा प्रवास सुरू ठेवेन, जेणेकरून आपण भविष्यात आणखी विजेतेपदे जिंकू शकू. अगामी हंगामासाठी मी खूप उत्सुक आहे.’
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०२३-२४ हंगामात विजेतेपद पटकावत रणजी करंडकाचा सात वर्षांचा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर संघाने २०२४-२५ हंगामात इराणी करंडकही जिंकला. कर्णधारपद सोडले असले तरी, आपला निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे रहाणेने स्पष्ट केले आहे. तो सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एक फलंदाज म्हणून मुंबई संघासाठी खेळत राहणार आहे, असे त्याने व्यक्त केले आहे.
रहाणेच्या निर्णयानंतर मुंबई संघाचा पुढील कर्णधार कोण असेल, यावर चर्चा सुरू झाली आहे. मुंबई संघात श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि सर्फराज खान यांसारखे अनुभवी खेळाडू उपलब्ध आहेत. जैस्वाल आणि सर्फराज वगळता, इतर खेळाडूंचा कर्णधारपदाचा अनुभव उल्लेखनीय आहे. श्रेयस अय्यरने तीन आयपीएल फ्रँचायझींचे नेतृत्व केले आहे, तर सूर्यकुमार यादव हा भारताच्या विद्यमान टी-२० संघाचा कर्णधार आहे.
यशस्वी जैस्वालची कसोटी क्रिकेटमधील व्यस्तता लक्षात घेता, निवड समिती देशांतर्गत हंगामात बहुतेक काळ उपलब्ध असणाऱ्या कर्णधाराला प्राधान्य देऊ शकते. त्यामुळे, रहाणेच्या जागी मुंबईच्या कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे दोघे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.