

Mustafizur Rahman IPL removal
नवी दिल्ली : मुस्तफिजुर रहमानला शनिवारी आयपीएलमधून (IPL) वगळण्याच्या निर्णयाचा बांगलादेशने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "अतिरेकी जातीय गटांसमोर नमतं घेत, भारतीय क्रिकेट बोर्डाने कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजुर रहमानला संघातून वगळण्याचे निर्देश दिले आहेत. मी या निर्णयाचा तीव्र निषेध करतो," असे बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार आसिफ नजरुल यांनी फेसबुकवर लिहिले आहे.
नजरुल यांनी पुढे सांगितले की, अंतरिम सरकारने क्रिकेट बोर्डाला या प्रकरणात आयसीसीच्या (ICC) हस्तक्षेपाची मागणी करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, भारतीय क्रिकेट बोर्ड हे आयसीसीचे महत्त्वाचे घटक असले तरी, आयपीएल ही एक देशांतर्गत स्पर्धा आहे आणि त्याच्या प्रशासनावर आयसीसीचे कोणतेही अधिकार नाहीत.
क्रीडा मंत्रालयाचे प्रभारी सल्लागार नजरुल म्हणाले, "मी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला या संपूर्ण प्रकरणाचे स्पष्टीकरण देणारे औपचारिक पत्र आयसीसीला लिहिण्याचे निर्देश दिले आहेत. बोर्डाने स्पष्टपणे नमूद केले पाहिजे की, जर करारबद्ध असूनही एखादा बांगलादेशी क्रिकेटपटू भारतात खेळू शकत नसेल, तर संपूर्ण राष्ट्रीय क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिथे जाणे बांगलादेश सुरक्षित मानू शकत नाही."
अंतरिम सरकारने देशात आयपीएल सामन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी घालण्याचे पाऊलही उचलले आहे. "मी बोर्डाला अशी विनंती करण्यास सांगितले आहे की, बांगलादेशचे विश्वचषक सामने भारताऐवजी श्रीलंकेत आयोजित केले जावेत. याशिवाय, बांगलादेशात आयपीएल सामन्यांचे प्रक्षेपण स्थगित करण्यात यावे, अशी विनंती मी माहिती आणि प्रसारण सल्लागारांना केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही बांगलादेश, बांगलादेशी क्रिकेट किंवा बांगलादेशी क्रिकेटपटूंचा अपमान खपवून घेणार नाही. गुलामगिरीचे दिवस आता संपले आहेत," असे नजरुल यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य केल्याच्या घटनांनंतर मुस्तफिजुरच्या समावेशावरून भारतात निदर्शने झाली होती. त्यानंतर बीसीसीआयने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजुर रहमानला संघातून मुक्त करण्याचे आदेश दिले, ज्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशने ही भूमिका घेतली आहे.