

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बडोद्याची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. विदर्भासमोर बडोद्याची अवस्था ५ बाद ७१ अशी झाली होती. मात्र यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले.
Hardik Pandya Video : टीम इंडियाचे स्टार फलंदाज सध्या देशातंर्गत क्रिकेट स्पर्धा गाजवत आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा या दोघांनी विजय हजारे ट्रॉफीत आपल्या नावाला साजेसी कामगिरी केली. यानंतर आता हार्दिक पांड्याने आज (दि.३ जानेवारी) एकाच षटकात तब्बल ५ षटकार ठोकत प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दाणादाण उडवली.
बडोद्याच्या हार्दिक पंड्याने विदर्भाविरुद्ध खेळताना मैदानावर चौफेर फटकेबाजी करत केवळ ९३ चेंडूत १३३ धावांची वादळी खेळी साकारली. या खेळीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याने एकाच षटकात पाच षटकार ठोकले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बडोद्याची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. विदर्भासमोर बडोद्याची अवस्था ५ बाद ७१ अशी झाली होती. मात्र यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले. त्याने आपल्या ११९ व्या 'लिस्ट ए' सामन्यात पहिलेवहिले शतक झळकावत बडोद्याला ५० षटकांत ९ बाद २९३ या आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
हार्दिकच्या या खेळीतील सर्वात रोमांचक क्षण ३९ व्या षटकात पाहायला मिळाला. विदर्भाचा फिरकीपटू पार्थ रेखाडे याच्या षटकावर हार्दिक तुटून पडला. त्याने या षटकातील पहिल्या पाच चेंडूंवर सलग पाच उत्तुंग षटकार ठोकले, तर शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. एकाच षटकात ३४ धावा कुटल्यामुळे मैदानावरील वातावरण कमालीचे उत्साही झाले होते.
हार्दिकच्या या खेळीत एकूण ११ षटकार आणि ८ चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्याने केवळ ३१ एकेरी धावा घेतल्या. बडोद्याच्या डावात हार्दिकनंतर विष्णू सोळंकी (२६ धावा) हा दुसरा सर्वोच्च धावसंख्या करणारा फलंदाज ठरला. इतर फलंदाजांना खेळपट्टीवर टिकणे कठीण जात असताना हार्दिक मात्र वेगळ्याच लयीत दिसत होता.