

मुंबई; वृत्तसंस्था : न्यूझीलंडविरुद्ध आगामी 3 सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, यानुसार कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांनी पुनरागमन केले आहे. मात्र, श्रेयस अय्यरचा सहभाग हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) सेंटर ऑफ एक्सलन्सकडून (सीओई) मिळणार्या तंदुरुस्ती प्रमाणपत्रावर अवलंबून असेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेला मुकलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचेही वन डे संघात पुनरागमन झाले आहे. या तीन खेळाडूंच्या परतण्यामुळे तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड आणि ध्रुव ज्युरेल यांना वगळण्यात आले आहे. वर्माचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका सामन्यात अंतिम एकादशमध्ये समावेश होता. मात्र, त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही, तर ज्युरेल तिन्ही सामन्यांत राखीव खेळाडू म्हणून होता. दुसरीकडे, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतकी खेळी करून गायकवाडने प्रभावित केले असले, तरी त्याला संघातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या श्रेयस अय्यरसाठी संघातून बाहेर व्हावे लागले. मुंबईकर खेळाडूच्या पुनरागमनामुळे भारतीय संघ व्यवस्थापन समाधानी असेल. गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौर्यादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली होती.
या दरम्यान, भारताविरुद्धच्या या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाचे नेतृत्व ब्रेसवलेकडे असणार आहे. डावखुरा फिरकीपटू लेनॉक्स हा नवोदित चेहरा असेल. गोलंदाजी अष्टपैलू ख्रिस्तीयन क्लार्क, आदित्य अशोक, जोश क्लार्कसन व जलद गोलंदाज मायकल रे यांचा या संघात समावेश आहे.
दरम्यान, जसप्रीत बुमराहबरोबरच यावेळी हार्दिक पंड्याला देखील वन डे मालिकेतून वर्कलोड मॅनेजमेंटसाठी विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पंड्या अद्याप गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. पंड्या मांडीच्या दुखापतीमुळे काही काळ मैदानाबाहेर राहिला असून त्यानंतर अलीकडेच द. आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र, पंड्याला अद्याप 10 षटके गोलंदाजीसाठी एनसीएने परवानगी दिलेली नाही. आगामी आयसीसी टी-20 विश्वचषकाचा विचार करता, न्यूझीलंडविरुद्ध वन डे मालिकेत त्याला संघात घेण्यात आले नसल्याचे मंडळाने यावेळी स्पष्ट केले.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल.