

babar azam reacts on virat kohli comparison
इस्लामाबाद : पाकिस्तानमधील क्रिकेटपटू बाबर आझम आणि भारताचा वनडेतील स्टार फलंदाज विराट कोहली याची तुलना पाकिस्तानधनील क्रिकेट चाहत्यांमध्ये नेहमीच होत असते. वास्तविक बाबर आझमची आजवरची कामगिरी ही विराटबरोबर तुलना करण्यासारखी नाहीच. तरीही पाकिस्तानमधील माध्यमात यावर नेहमीच चर्चा होते. आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) पेशावर झल्मीचे नेतृत्व करणाऱ्या बाबर आझमचा एका पत्रकारासोबत खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
हैदराबाद किंग्समन विरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने ने ३७ चेंडूत ४३ धावांची खेळी केली, मात्र संघाला विजय मिळवून देण्यापूर्वीच तो बाद झाला. हैदराबाद किंग्समनने दिलेल्या १४६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बाबर आझम चांगल्या फॉर्मात दिसत होता. मात्र, सेट झाल्यानंतरही त्याला ही खेळी मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करता आली नाही. पेशावर झल्मीने हा सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला असला, तरी बाबरच्या 'फिनिशिंग' क्षमतेवर पत्रकाराने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पत्रकाराने त्याची तुलना भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीशी केल्याने बाबरचा संयम सुटला.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने बाबरला थेट विचारले की, "विराट कोहली तुझ्यासारख्याच शैलीत खेळतो; पण तो नेहमी सामने फिनिश करतो, तुला ते जमत नाही. लोक तुझी विराटशी तुलना करतात, यावर तुमचे मत काय?"
पत्रकाराचा हा प्रश्न ऐकताच बाबर आझम भडकला. त्याने विराट कोहलीबरोबरील तुलना फेटाळून लावताना तो म्हणाला की, "हे विषय आता थांबवा आणि स्वतःपुरतेच मर्यादित ठेवा. ही तुलना आता तरी संपवा. मी सामने फिनिश करू शकत नाही, हा तुमचा केवळ गैरसमज आहे.
पाकिस्तानचा स्टार फलंदाज असूनही, बाबर आझमवर विशेषतः टी-२० फॉरमॅटमध्ये सातत्याने टीका होत असते. त्याचा संथ स्ट्राईक रेट आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना जबाबदारी न पेलणे, यावरून अनेकदा क्रिकेट तज्ज्ञ त्याच्यावर निशाणा साधतात.यंदाच्या पीएसएल हंगामात बाबरने दोन सामन्यांत ८२ धावा केल्या आहेत, परंतु त्याचा स्ट्राईक रेट १२६.१५ इतकाच आहे. या दोन सामन्यांत त्याने १० चौकार आणि केवळ १ षटकार लगावला आहे, जी त्याच्या नावाच्या वलयानुसार निराशाजनक आकडेवारी मानली जात आहे.