

Virat Kohli
पर्थ: १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ सध्या पर्थमध्ये कसून सराव करत आहे. या दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन दिग्गज खेळाडू फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार असल्याने, त्यांच्या प्रत्येक उपस्थितीकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पर्थमध्ये विराट कोहलीचा एका लहान चाहत्यासोबतचा खास क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
पर्थमध्ये सराव सुरू असताना, एका लहानग्या चाहत्याला विराट कोहलीची ऑटोग्राफ घेता आली. ऑटोग्राफ मिळताच या चिमुकल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो जागेवरच आनंदाने उड्या मारत आणि धावत सुटला. मैदानावर आणि मैदानाबाहेर या सुपरस्टार्सचा चाहत्यांवर किती मोठा प्रभाव आहे, याची आठवण करून देणारा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दिग्गजांचा कसून सराव
तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वीच्या पहिल्या सराव सत्रात कोहली आणि रोहित यांनी जवळपास ३० मिनिटे फलंदाजीचा सराव केला. रोहित शर्मा नेटमधून बाहेर पडल्यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत बराच वेळ चर्चा करताना दिसला. या वर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या आणि गेल्या वर्षी टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर टी२० संघातूनही दूर झालेल्या या खेळाडूंसाठी ही ऑस्ट्रेलियातील कदाचित शेवटची मालिका असू शकते. २०२७ च्या विश्वचषकात त्यांचा सहभाग फॉर्म आणि फिटनेसवर अवलंबून असला तरी, नवा कर्णधार शुभमन गिलने त्याच्या अनुभवावर विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, चाहत्यांसाठी कोहलीची ऑटोग्राफ घेणाऱ्या त्या लहान मुलासारखे क्षणच या दोन महान खेळाडूंचे महत्त्व दाखवतात.